Vidhan Sabha 2019 : लढत भाजप-शिवसेनेतच, पण संधी आघाडीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 12:01 PM2019-10-02T12:01:51+5:302019-10-02T12:02:48+5:30

शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये जागा वाटपावरून संघर्ष निर्माण होत आहे. हा संघर्ष असाच कायम राहिल्यास, आघाडीसाठी संधी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेला स्थानिक नेत्यांची समजूत काढणे गरजेचे बनले आहे.

Vidhan Sabha 2019: BJP-Shiv Sena contesting, but opportunity for Congress-NCP | Vidhan Sabha 2019 : लढत भाजप-शिवसेनेतच, पण संधी आघाडीला

Vidhan Sabha 2019 : लढत भाजप-शिवसेनेतच, पण संधी आघाडीला

googlenewsNext

- रवींद्र देशमुख

मुंबई - अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक आली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्याचा धडका सुरू करण्यात आला आहे. यावेळी उमेदवारी जाहीर करण्यात सर्वच पक्षांकडून उशीर करण्यात आला आहे. बंडखोरीवर उपाययोजना म्हणून उमेदवारी जाहीर करण्यात दिरंगाई करण्यात आली आहे. मात्र जागा वाटप आणि नाराजांची यादी पाहता, विधानसभा निवडणुकीची सरळ लढत युती असताना देखील भाजप-शिवसेनेतच होण्याची शक्यता आहे. यामुळे दोघांच्या भांडणात आघाडीला यश मिळविण्याची संधी निर्माण होणार आहे.

2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेसह आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील स्वबळावर लढले होते. यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. सुरुवातीला नकार देणारा शिवसेना पक्ष अखेरीस भाजपसोबत सत्तेत सामील झाला. राज्यात सत्तेत असताना सुद्धा शिवसेना आणि भाजपने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवली. त्यामुळे 2019 मध्ये विधानसभा निवडणूक देखील शिवसेना-भाजप स्वबळावर लढवणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्या दृष्टीने राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. शिवसेनेचे काही नेते भाजपमध्ये गेले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये मेगा भरतीच झाली.

युती होणार नाही, असा विचार करून भाजप आणि शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांची आता पंचाईत झाली आहे. युती तुटल असंच या नेत्यांनी गृहीत धरले होते. मात्र ऐनवेळी सगळ उलट झाल्यामुळे सत्ताधारी पक्षातील नाराजांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता ही नाराजी ऐन निवडणुकीत गुप्त पद्धतीने समोर येण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी उघड-उघड विरोध दर्शविण्यात येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड आणि गंगापूर तालुक्यातील बंडाळी समोर आली आहे. तर पुण्यात देखील हेच होण्याची शक्यता आहे. सिल्लोड मतदार संघ युतीत 25 वर्षांपासून भाजपकडे होता. परंतु, जागा वाटपात हा मतदार संघ अब्दुल सत्तार यांच्यासाठी शिवसेनेला सोडण्यात आला. यामुळे येथील भाजपचे स्थानिक नेते नाराज झाले आहेत. तर काहींनी सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. त्यामुळे सत्तार यांचा मार्ग खडतर झाला आहे.

दुसरीकडे गंगापूर मतदारसंघ शिवसेनेला हवा होता. परंतु, भाजपने या मतदार संघातून प्रशांत बंब यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते नाराज झाले असून विरोधकांसोबत मिळून बंब यांच्याविरुद्ध काम करायचे नियोजन काही नेत्यांनी केली आहे. त्यामुळे बंब यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

तसेच पुण्यात भाजपने शहरातील एकही मतदार संघ शिवसेनेला सोडला नाही. यावरून शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांकडून युती धर्म पाळला जाईल का, यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अशीच स्थिती राज्यातील अनेक मतदारसंघात निर्माण झाली आहे. एकंदरीत शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये जागा वाटपावरून संघर्ष निर्माण होत आहे. हा संघर्ष असाच कायम राहिल्यास, आघाडीसाठी संधी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेला स्थानिक नेत्यांची समजूत काढणे गरजेचे बनले आहे.

 

Web Title: Vidhan Sabha 2019: BJP-Shiv Sena contesting, but opportunity for Congress-NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.