Video: युतीमुळे शिवसेनेत पडले दोन गट?; बाळासाहेबांना मानणारे शिवसैनिक झाले नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 04:07 PM2019-09-30T16:07:59+5:302019-09-30T16:16:03+5:30

भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर कल्याण पश्चिम व कल्याण पूर्व या दोन्ही ठिकाणी भाजपचा उमेदवार दिल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाहीत असं सांगत शिवसेना शहर कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Video: Two groups fall in Shiv Sena due to coalition ?; ShivSainik who believed in Balasaheb became angry | Video: युतीमुळे शिवसेनेत पडले दोन गट?; बाळासाहेबांना मानणारे शिवसैनिक झाले नाराज

Video: युतीमुळे शिवसेनेत पडले दोन गट?; बाळासाहेबांना मानणारे शिवसैनिक झाले नाराज

Next

कल्याण - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली आहे. भारतीय जनता पार्टीसोबत युती केल्याने पारंपारिक शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण शहरात शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण शहर शिवसेना शाखेत या नाराज शिवसैनिकांनी बैठक घेतली. यामध्ये कल्याण पूर्व, पश्चिम विधानसभेचे प्रमुख अरविंद मोरे, माजी महापौर राजेंद्र देवळेकर, नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेवक रमेश जाधव, शिव वाहतूक सेनेचे उपशहर प्रमुख महेश भोसले यांच्यासह शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. 

कल्याण पूर्वमध्ये अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर कल्याण पश्चिममध्ये विद्यमान नरेंद्र पवार हे भाजपाचे आमदार आहेत. युती झाली तर या दोन्ही जागा भाजपाच्या वाट्याला येतील त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले हे मतदारसंघ भाजपाचा गड बनू लागलेत असं शिवसैनिकांना वाटतं. त्यामुळे शिवसैनिकांनी संतप्त भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचा भाजपचा कुटिल डाव असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. 

भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर कल्याण पश्चिम व कल्याण पूर्व या दोन्ही ठिकाणी भाजपचा उमेदवार दिल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाहीत असं सांगत शिवसेना शहर कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र या घोषणाबाजीत शिवसैनिकांनी दिलेल्या विशेष घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बाळासाहेबांना मानणाऱ्या शिवसैनिकांचा विजय असो या घोषणेने अनेकांच्या भूवया उंचावल्या. या घोषणेवरुन कुठेतरी शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंना मानणारा गट वेगळा पडलाय का असा प्रश्न उपस्थित होतो. या वादाची पहिली ठिणगी कल्याणमध्ये पेटली आहे. 

शिवसेनेचे प्राबल्य असताना या दोन्ही मतदारसंघांत शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे. त्यामुळे पक्ष वाचविण्यासाठी भाजपविरोधात उमेदवार दिला जाईल. ही पक्षाविरोधात बंडाळी नसून भाजपविरोधात उपसलेले हत्यार असल्याचा दावा इच्छुकांनी केला आहे. २०२० मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. कल्याण पश्चिम व पूर्व विधानसभा भाजपला दिल्यास त्याचे परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यताही इच्छुकांनी व्यक्त केली.

शिवसेनेच्या इच्छुकांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवावा. त्यांनी युतीचा विचार करुनच निर्णय घेतला असेल. युतीच्या उमेदवाराचे शिवसेनेच्या इच्छुकांनी काम केले पाहिजे. पक्षश्रेष्ठी यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील, असे भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी याबाबत बोलताना सांगितले. 

Web Title: Video: Two groups fall in Shiv Sena due to coalition ?; ShivSainik who believed in Balasaheb became angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.