Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:37 IST2025-09-19T13:35:56+5:302025-09-19T13:37:15+5:30
आठवड्याचे ३ दिवस मुंबईत आणि बाकीचे दिवस मतदारसंघात असतात. मंत्र्यांनी पक्षासाठी वेळ द्यायला हवा. जर पक्षापेक्षा काही मंत्र्यांना इतर कामे जास्त असतील तर ते पद आपण मोकळे करूया अशी तंबी अजित पवारांनी दिली.

Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
नागपूर - बऱ्याचदा मंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यात जातात. तिथे पक्षातील जिल्हाध्यक्षाला विचारत नाहीत, त्यांच्याकडे पाहतही नाहीत. त्यांच्याशी बोलत नाही. तो आपल्या परिवारातील घटक आहे त्यामुळे असं वागू नका. आपल्याला तसं करून चालणार नाही. माझ्यासह सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील मंत्र्यांचे कान टोचले आहेत.
नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर पार पडले. या शिबिरात अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाने वेळेला महत्त्व दिले पाहिजे. वेळेत कार्यक्रमाला आले पाहिजे. पुढच्या वेळी ठरलेल्या वेळेत कार्यक्रम सुरू व्हायला हवा. कार्यक्रमस्थळी दरवाजा बंद करावा का असा विचार सुरू आहे. विमानासारखे टेक ऑफ व्हायच्या दरवाजा बंद करून टाकतात. कुणाला किती गांभीर्य आहे हे एकदा कळू द्या. एक दिवस तुम्हाला वेळेत या सांगितले तरी काहींना त्रास होतो. सत्ता आणि पदांसाठी आपण पाऊल उचललं नव्हते तर महाराष्ट्राला स्थिरता, प्रगती आणि ठोस निर्णयांची गरज आहे म्हणून आपण हा मार्ग स्वीकारला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच आठवड्याचे ३ दिवस मुंबईत आणि बाकीचे दिवस मतदारसंघात असतात. मंत्र्यांनी पक्षासाठी वेळ द्यायला हवा. जर पक्षापेक्षा काही मंत्र्यांना इतर कामे जास्त असतील तर ते पद आपण मोकळे करूया, ते दुसऱ्या कुणाला तरी देऊया. नुसते शिबिर घेऊन चालणार नाही. या शिबिरात जे निर्णय होतील त्यांची अंमलबजावणी करणार आहे. संघटना संघटनेचे काम करेल. काही गोष्टीत बदल करायच्या आहेत. पूर्वीच्या राजकारणात आणि आत्ताच्या राजकारणात जमीन अस्मानचा फरक आहे. सोशल मिडिया सक्रीय आहे. एखाद्या बाबींत मागचे पुढचे बाजूला करून काही क्लिप दाखवून ट्रोल केले जाते. काही कामे करत नाहीत त्यांना प्रसिद्धी मिळते. काही कामे करतात परंतु त्यांना प्रसिद्धी मिळत नाही असंही अजित पवारांनी सांगितले.
दरम्यान, ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळाले आहे. त्यांना त्या त्या जिल्ह्यात जावे लागेल. फक्त १ मे, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी तेव्हाच जायचं असं नाही. त्या दिवशी जावेच लागेल त्याव्यतिरिक्त जिल्ह्यात काम करावे लागेल. तिथले जिल्हाधिकारी, प्रमुख आमदार, खासदार यांना सोबत घेऊन आपल्याला लोकांमध्ये फिरावे लागेल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या.