Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:34 IST2025-10-27T15:32:17+5:302025-10-27T15:34:48+5:30
हिंदी भारतासाठी अनेक राज्यात चालणारी भाषा आहे. ती पण आली पाहिजे. परंतु मराठी मातृभाषा उत्तमपणे बोलता आली पाहिजे असं अजित पवारांनी सांगितले.

Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
वाई - आपण आपल्या मायमराठीचा अभिमान आणि स्वाभिमान जपला पाहिजे. नव्या पिढीला मराठी भाषेची गोडी लागली पाहिजे. त्यासाठी घरात आणि महाराष्ट्रात मराठीत बोला असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. वाई तालुक्यातील एकसर येथे पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे प्रतिष्ठानच्या कलास्मारकाची पाहणी त्यांनी केली तसेच नव्यानं उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत स्मृती स्मारकाच्या भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळ्यात ते सहभागी झाले होते. या कार्यक्रमात मराठी भाषेवरून अजित पवारांनी सूचक इशाराही लोकांना दिला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अलीकडच्या काळात आपली मराठी भाषा इतकी महत्त्वाची आहे. आज बहुतेकांची मुले, नातवंडे इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकली जातात. प्रत्येकाला जे वाटेल त्यांनी करावे परंतु घरात असेल महाराष्ट्र असेल तिथे सतत मराठी बोलत राहा. नाहीतर भविष्यात मराठी अशी काही भाषा होती असं दहा वीस पिढ्यानंतर सांगण्याची वेळ येऊ नये. यासाठी आपण आपल्या मातृभाषेचा अभिमान ठेवला पाहिजे. त्यामुळे कुणी तरी आपल्याशी हिंदी बोलायला लागले तर आपण लगेच हिंदी बोलतो असं न करता आपण त्याच्याशी मराठीच बोलायचे. ते झक मारत मराठीत बोलतील असंही त्यांनी सांगितले.
तसेच हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. उगीच काही जण आव आणण्याचा प्रयत्न करतात. इंग्लिशबाबत काही विचारण्याची सोय नाही. हे ठीक आहे. जगात फिरण्यासाठी ही भाषा आली पाहिजे. हिंदी भारतासाठी अनेक राज्यात चालणारी भाषा आहे. ती पण आली पाहिजे. परंतु मराठी मातृभाषा उत्तमपणे बोलता आली पाहिजे. लिहिता आणि वाचता आली पाहिजे. एकदा मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता आली तर हिंदी बोलायला काही अडचण येत नाही याची पण नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे असं आवाहन अजित पवार यांनी उपस्थित जनतेला केले.
आपण आपल्या मायमराठीचा अभिमान आणि स्वाभिमान जपला पाहिजे. नव्या पिढीला मराठी भाषेची गोडी लागली पाहिजे..! pic.twitter.com/t0oKOiYQBf
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 26, 2025
हिंदीसक्तीवरही अजित पवारांची ठाम भूमिका
राज्यातील महायुती सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शिवसेना-मनसेसारखे प्रादेशिक पक्ष आणि इतर सामाजिक संघटना एकवटल्या आणि पहिलीपासून हिंदी नकोच अशी ठाम भूमिका घेतली. परंतु राज्य सरकारमध्ये सत्तेत असतानाही अजित पवारांनी या निर्णयावर त्यांची भूमिका मांडली होती. पहिली ते चौथीपर्यंत मातृभाषेतच शिक्षण हवे. हिंदी भाषा पाचवीपासून पुढे शिकता येईल असं सांगत अजित पवारांनी सरकारच्या निर्णयाविरोधात भाष्य केले होते.