Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 09:31 IST2025-10-02T09:31:03+5:302025-10-02T09:31:47+5:30
मराठी हिंदीमध्ये फरक काय आहे? मी मराठीत बोलू शकतो. पण मराठीत बोलण्याची गरज काय? ही भिवंडी आहे, असं वादग्रस्त विधान अबू आझमी यांनी केले होते.

Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
मुंबई - भिवंडी येथील कार्यक्रमात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मराठीवरून केलेल्या विधानानं वाद निर्माण झाला होता. मी मराठी बोलू शकतो, पण इथं मराठीची गरज काय, ही भिवंडी आहे असं आझमींनी म्हटलं. अबू आझमींच्या या विधानावरून मनसेने आक्रमक पवित्रा घेत त्यांना हे महाराष्ट्र आहे, इथे मराठीच चालणार असं सांगत तुम्हाला लाज वाटत असेल तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ असं मनसेनं म्हटलं. आता या वादावर अबू आझमी यांना उपरती झाल्याचं दिसून येते. आय लव्ह मराठी, मी मराठी शिकतोय असं त्यांनी माध्यमांच्या मुलाखतीत म्हटलं.
अबू आझमी म्हणाले की, मी बोलत होतो, तिथे सर्व देशातील मिडिया होती. संपूर्ण देशात मराठी बोलली जात नाही. त्यामुळे माझं बोलणं देशाला कळायला हवे म्हणून मी मराठी बोलू शकतो, परंतु इथं गरज नाही असं बोललो. मी मराठीचा द्वेष करत नाही. कुणाच्या दबावात आणि भीतीने मी मराठी शिकत नाही. मी महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्राची भाषा मराठी, त्याचा मी सन्मान करतो. २००९ ला यावरून मला खूप टार्गेट केले गेले. विधानसभेत माझे कपडे फाडले गेले. मला धक्का दिला होता, माईक खेचला होता. माझं शिक्षण मराठीतून झाले नाही. त्यामुळे मी हिंदीत बोललो होतो. मला जे वाटले तेव्हा मी ते केले होते असं त्यांनी सांगितले.
Mumbai, Maharashtra: Reacting to his own statement made in Bhiwandi, Samajwadi Party’s state president Abu Azmi says, "Marathi is not spoken across the entire country. My message should reach everyone... I don’t hate Marathi, and I won’t learn it under anyone’s pressure. I live… pic.twitter.com/bhxdNktJtK
— IANS (@ians_india) October 1, 2025
तसेच मी कुणाच्या भीतीने नाही तर महाराष्ट्रातील लोकांच्या प्रेमापोटी मी मराठी शिकत आहे. दररोज ऑनलाईन शिक्षकांकडून मी मराठी शिकत आहे. चुराना - चोरणे, घुसना - घुसणे, गिरना - पडणे असे शब्द रोज शिकत आहे. आय लव्ह मराठी, माझ्या ऑफिसमधील जे कर्मचारी आहेत, ज्यांना मराठी येते त्यांनाही मी माझ्याशी मराठीत बोला असं सांगितले आहे. हे कुणाच्या भीतीने नाही तर महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मी महाराष्ट्रात राहतोय म्हणून बोलतोय. काही लोक ज्यांचे मराठीशी काय देणे घेणे नाही केवळ राजकीय पोळी भाजत असतात. मी त्यातला नाही असंही अबू आझमी यांनी म्हटलं.
काय आहे वाद?
मराठी हिंदीमध्ये फरक काय आहे? मी मराठीत बोलू शकतो. पण मराठीत बोलण्याची गरज काय? ही भिवंडी आहे, असं वादग्रस्त विधान अबू आझमी यांनी केले होते. आझमींच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेने त्यांना प्रत्युत्तर दिले. अबू आझमी तुम्ही महाराष्ट्रात राजकारण करता. महाराष्ट्रात राजकारण करत असताना उत्तर प्रदेशातील भैय्याची तुम्हाला काळजी वाटते काय? भिवंडी महाराष्ट्रात आहे आणि इथे मराठीच चालणार आहे. तुम्हाला मराठी बोलायला लाज वाटत असेल तर तुम्हाला मनसे स्टाईल उत्तर देण्यात येईल असा इशारा मनसेच्या परेश चौधरी यांनी दिला होता.