Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 17:45 IST2025-10-27T17:42:20+5:302025-10-27T17:45:01+5:30
या २ मुलींनी निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने या दोघींचे प्राण वाचले.

Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
पुणे - पोलीस यंत्रणेला हाताशी धरायचे, जो कुणी आपलं ऐकत नाही त्यांना पाहिजे त्या पद्धतीने दाबत राहायचे अशी त्यांची मोडस ऑपरेंडी आहे असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर केला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत अंधारे यांनी निंबाळकरांवर अनेक धक्कादायक आरोप करत २ सख्ख्या बहिणींना माध्यमांसमोर आणले.
या २ मुलींनी निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने या दोघींचे प्राण वाचले. मात्र इतकेच नाही तर या मुलींवर आणि त्यांच्या आईवर निंबाळकरांच्या दबावामुळे खंडणी, मकोकासारखे गुन्हे पोलिसांनी नोंदवली असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत एक फोटो दाखवला. त्या फोटोतील उपचार घेणारी तरूणी आणि तिच्या बहिणीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकट्या डॉ. संपदा मुंडे हिचा जीव गेला नाही तर तिच्यासारखे अनेक आहेत. दिंगबर आगवणे हे नाव फलटण मतदारसंघात सगळ्यांना माहिती आहे असं सांगत ज्या मुलींनी जीव देण्याचा प्रयत्न केला त्यामागचे कारण सांगण्यासाठी सुषमा अंधारे यांनी त्या २ बहिणींनाच पत्रकार परिषदेसमोर आणले.
कोण आहे वैशाली आगवणे?
वैशाली आगवणे या दिंगबर आगवणे यांच्या कन्या आहेत. या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या की, ९ ऑगस्ट २०२२ रोजी वडिलांना अटक झाली. त्यानंतर ९ नोव्हेंबरला घरावर जप्ती झाली, त्याआधी ८ नोव्हेंबरला आम्ही औषध घेतले होते. जगदीश कदम हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी घरी येऊन धमकी दिली होती. आम्ही तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावला, आता तुमचाही कार्यक्रम लावू असं म्हटले. जी माणसं वडील असताना घराचा उंबरठा ओलांडत नव्हती तीच माणसे घरात आणि किचनपर्यंत वावरत होती. आम्हाला खूप भीती वाटत होती. या भीतीपोटी आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्नी यांना फोनही केला होता. वहिनीसाहेब आम्हाला खूप भीती वाटतेय, हे कुठेतरी थांबवा असं म्हटलं. परंतु यात मी काहीच करू शकत नाही असं उत्तर त्यांनी दिले. आज जी परिस्थिती संपदा मुंडे यांची होती, त्यांचा मानसिक छळ केला होता, त्या खूप घाबरल्या होत्या. तशीच मनस्थिती आमची होती. वडिलांच्या अटकेनंतर २ दिवसांत आईवरही गुन्हा दाखल झाला, ती तिथे नव्हती त्यामुळे आम्हाला पाठिंबा देणारे कोणच नव्हते. आम्ही दोघीच बहिणी घरी असायचो, त्यामुळे आमच्यावरही कुणी हात टाकेल अशी भीती वाटत होती त्यामुळे काहीतरी वाईट होण्यापेक्षा स्वत:चा जीव संपवण्यासाठी आम्ही औषध घेतले असं वैशाली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, दिगंबर आगवणे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची अनेक व्यवसायांमध्ये भागीदारी होती. दिगंबर आगवणे यांना न सांगता रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी त्यांच्या अनेक मालमत्ता बँकेकडे तारण ठेवल्या. त्यानंतर दिगंबर आगवणे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले. एकाच माणसांवर २४ गुन्हे दाखल करण्यात आले. दिगंबर आगवणे यांच्या कुटुंबातील महिलांवर मकोकासारखे गुन्हे दाखल केले असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. या पत्रकार परिषदेत दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे यादेखील होत्या. त्यांनी जो त्रास संपदा मुंडे यांना झाला त्या त्रासातून आम्ही मागील २ वर्षापासून जात आहोत. कुणीही आमची दखल घेत नाही. आम्ही पत्रकार परिषदा घेतल्या परंतु त्याच्याही बातम्या दाबण्याचं काम करण्यात आले. सत्तेचा गैरवापर करून आमच्या कुटुंबाचा छळ करत विविध गुन्हे दाखल केले आहेत असं त्यांनी सांगितले.