विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक जिल्ह्यांत गारपीट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 05:11 AM2020-01-03T05:11:32+5:302020-01-03T07:00:10+5:30

पिकांचे प्रचंड नुकसान; बोचऱ्या थंडीमुळे नागरिक हैराण

Vidarbha receives periodic rains; Hailstorm in many districts | विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक जिल्ह्यांत गारपीट

विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक जिल्ह्यांत गारपीट

googlenewsNext

नागपूर : ऐन हिवाळ्यात नागपूरसह विदर्भातील वर्धा, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागांना गुरुवारी अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे जनसामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. सकाळपासूनच नागपूर जिल्ह्यात वादळासह पाऊस सुरू झाला. बऱ्याच ठिकाणी गारपीटही झाली. बोचºया थंडीमुळेही लोक हैराण झाले.

पावसामुळे नागपूरच्या अनेक भागांत पाणी साचले. गारपीट आणि वादळ व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील संत्रा, मोसंबीसह खरीप व रब्बी तसेच भाजीपाल्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड, काटोल, कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील काही भागांमध्ये गारपीट झाली. हिंगणा, कामठी, नागपूर (ग्रामीण), पारशिवनी, रामटेक, मौदा, कुही, उमरेड व भिवापूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे झाडांना असलेला कापूस भिजला असून, गहू जमीनदोस्त झाला आहे. शिवाय, तुरी, हरभरा आणि भाजीपाल्याच्या विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

वर्धा जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा कमी-अधिक जोर कायम आहे. आर्वी व कारंजा तालुक्याला गारपिटीने झोडपून काढले. आर्वी तालुक्यातील काही भागामध्ये एक फुटापर्यंत गारांचा ढीग साचला होता. आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट, समुद्रपूर, देवळी, वर्धा व सेलू या तालुक्यात अवकाळी पावसाची रिपरिप सुरूच होती.

भंडारा जिल्ह्यात तीन दिवस कोसळणाºया पावसाने शेतकरी चांगलेच धास्तावले असून, त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेला आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेले धान अवकाळी पावसाने ओले झाले आहे. रब्बी पिकांसह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले. तुमसर, मोहाडी तालुक्यात टोमॅटोची शेती उद्ध्वस्त झाली आहे. लाखनी तालुक्यात तूर आणि भाजीपाल्यालाही फटका बसला आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या सोळाही तालुक्यांत गारांसह वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कापूस, रब्बी ज्वारी, हरभरा, गहू, भाजीपाला व फळांचे नुकसान झाले. चंद्रपूरमध्ये काही प्रमाणात खरिपातील धानाचे आणि रब्बी पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, चंद्रपूरचा पारा ५.१ अंशापर्यंत खाली घसरला होता.

परभणी, नांदेड, हिंगोलीत पिकांवर विपरित परिणाम
मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाने फटका दिला. या पावसामुळे हरभरा, गव्हासह तुरीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. नांदेडच्या मुदखेड, लोहा, अर्धापूर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील नांदापूर, वारंगा फाटा, आडगाव रंजे, डोंगरकडा, कवठा, आखाडा बाळापूर, हयातनगर, दांडेगाव आदी परिसरात पावसाने हजेरी लावली.

गोंदिया जिल्ह्यात भात पिकाला फटका
गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला पावसाचा फटका बसला.
अवकाळी पावसामुळे धान भिजल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
१० हजार हेक्टरमधील कडधान्य पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हरभरा आणि गहू ही पिके गमावण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा भाजीपाला पिकांवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येते. तूर, मूग, उडीद, लाखोळी हे पीक फुलावर आहे. धुक्यामुळे फूल गळत असल्याने उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Vidarbha receives periodic rains; Hailstorm in many districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.