"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 20:38 IST2025-12-21T20:38:09+5:302025-12-21T20:38:09+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील निकालावरुन भाजप नेत्यांचे अभिनंदन केले आहे.

"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
Amit Shah on Nagar Parishad Election Result: महाराष्ट्रातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. भाजप या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने ग्रामीण आणि निमशहरी भागात आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
"मोदीजींच्या व्हिजनवर जनतेचा विश्वास"
"महाराष्ट्र नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीत महायुतीला प्रचंड समर्थन दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार. हा विजय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारांच्या जनकल्याणकारी योजनांवर जनतेने दिलेला आशीर्वाद आहे," असं अमित शाह यांनी म्हटलं. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
भाजपची विक्रमी कामगिरी
या निवडणुकीत भाजपने केवळ सर्वाधिक जागाच जिंकल्या नाहीत, तर बहुतांश नगराध्यक्षपदांवरही आपला ताबा मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात भाजपचे ३,३०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले आहेत. तर भाजपचे १२२ ते १३४ नगराध्यक्ष थेट निवडून येण्याचा अंदाज आहे. एकूण निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी तब्बल ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपचे आहेत.
"भाजप आता महाराष्ट्राचा नंबर १ पक्ष"
विजयानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "२०१४ पासून भारतीय जनता पक्ष हा केवळ शहरांचाच नाही, तर ग्रामीण भागातील जनतेचाही पक्ष बनला आहे. या निकालाने भाजप हा महाराष्ट्रातील नंबर १ पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जिथे आम्हाला यश मिळाले नाही, तिथेही आम्ही पूर्ण ताकदीने विकासकामे करू."
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. तर पुणे जिल्हा आणि मराठवाड्यातील अनेक नगरपंचायतींमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपला दबदबा कायम राखला आहे.
महाविकास आघाडीची पिछेहाट
या निवडणुकीत काँग्रेसने विदर्भात काही प्रमाणात यश मिळवले असले तरी, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांची मोठी वाताहात झाल्याचे चित्र आहे.