शुक्रतारा निखळला! ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 08:22 IST2018-05-06T08:01:57+5:302018-05-06T08:22:26+5:30

कांजूरमार्गमधील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Veteran singer arun date passes away | शुक्रतारा निखळला! ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन 

शुक्रतारा निखळला! ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन 

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन झालंय. आज सकाळी सहा वाजता कांजूरमार्ग येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. 4 मे रोजी त्यांचा 84 वा वाढदिवस होता. या निमित्तानं पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती ठिक नसल्यानं ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. 

'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे', असं म्हणत आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारे अरुण दाते यांच्या निधनानं भावगीतातील शुक्रतारा हरपल्याची भावना व्यक्त होतेय. अरुण दाते १९५५पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. वयाच्या पन्‍नाशीत त्यांनी भावगीतांवर लक्ष केंद्रित केलं. भातुकलीच्या खेळामधली, शुक्रतारा मंदवारा, शतदा प्रेम करावे, स्वरगंगेच्या काठावरती अशी अनेक गाणी अरुण दाते यांनी त्यांच्या सुरेल आवाजानं अजरामर केली. शुक्रतारा मंदवारा हे अरुण दाते यांचं गाणं अतिशय गाजलं. 

१९६२मध्ये अरुण दाते यांच्या शुक्रतारा मंदवारा या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. दाते यांनी हे गाणं गावं, यासाठी संगीत दिग्दर्शक त्यांना कायम आग्रह करायचे. आपण हिंदीभाषिक प्रदेशातील असल्यानं मराठी उच्चार शुद्ध नसल्याचं कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला तीन वर्षे ते गाणं गायचं टाळलं. मात्र अखेर हे गाणं ध्वनिमुद्रित झालं आणि ते अफाट गाजलं. यानंतर पुढे अरुण दाते आपल्या कार्यक्रमांमध्येही ‘शुक्रतारा’ गाऊ लागले. २०१०पर्यंत अरुण दाते यांनी शुक्रतारा या नावानं मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम केले. अरुण दाते यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होतेय. 

Web Title: Veteran singer arun date passes away