ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 03:00 AM2020-10-09T03:00:18+5:302020-10-09T03:00:42+5:30

खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले. त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाली.

Veteran actor avinash kharshikar passes away | ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन

googlenewsNext

ठाणे : ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या वर्षी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती. या गंभीर परिस्थितीतूनही ते बरे होऊन बाहेर आले होते. मात्र, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.

जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते चार वर्षांपूर्वी ठाण्यात राहायला आले होते. खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केले. त्यांच्या अनेक नाटकांना रसिकांची पसंती मिळाली. तुझे आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशीतैशी, वासूची सासू, अपराध मीच केला ही त्यांची नाटके प्रचंड गाजली होती. त्यांच्या सगळ्या नाटकांचे मिळून जवळपास २२ हजारांहून अधिक प्रयोग झाले होते.

मराठी सिनेसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांपैकी ते एक होते. त्यांनी १९७८ मध्ये ‘बंदिवान मी या संसारी’ या मराठी सिनेमाच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, माफीचा साक्षीदार यासारख्या अनेक सिनेमांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ९०च्या दशकात अभिनयासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचीही तितकीत चर्चा सिनेसृष्टीत होती. सदाबहार खर्शीकर यांनी दैनंदिन मालिका ‘दामिनी’त महत्त्वाची भूमिका साकारली होती. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले यांच्यासोबत अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले होते.

दामिनी या मालिकेत मी खर्शीकर यांच्यासोबत काम केले होते. ते दिसायला तरुण होते. त्यामुळे ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असूनही मी त्यांच्या वडिलांची भूमिका केली होते.
- उदय सबनीस, ज्येष्ठ अभिनेते

मंगळवारी आम्ही दोघांनी मालिका, नाटक आणि जाहिरातींच्या चित्रीकरणावर चर्चा केली होती. लॉकडाऊननंतर ते त्यांच्या कामाला सुरुवात करणार होते. अचानक सकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली आणि धक्काच बसला.
- विजू माने, दिग्दर्शक

Web Title: Veteran actor avinash kharshikar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.