वाहतूक कोंडीतून वाहनांचा ‘रिव्हर्स गिअर’

By मनीषा म्हात्रे | Updated: August 31, 2025 15:35 IST2025-08-31T15:33:25+5:302025-08-31T15:35:18+5:30

मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात शनिवारी दुसऱ्या दिवशीही सीएसएमटी परिसर तीन तासांहून अधिक वेळ अडवून ठेवला.

Vehicles in 'reverse gear' to escape traffic jams | वाहतूक कोंडीतून वाहनांचा ‘रिव्हर्स गिअर’

वाहतूक कोंडीतून वाहनांचा ‘रिव्हर्स गिअर’

मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘बम, बम बंबई देखो जम गयी’, म्हणत मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात शनिवारी दुसऱ्या दिवशीही सीएसएमटी परिसर तीन तासांहून अधिक वेळ अडवून ठेवला. त्यामुळे दक्षिण मुंबई सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा ठप्प पडली. पोलिसांच्या अतिरिक्त फौजफाट्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे-पाटील यांच्या भाषणाची ऑडिओ क्लिप त्यांना ऐकविली. लोकांना वेठीस धरू नका. कोंडी करू नका, असे आवाहन करूनही मार्ग निघत नसल्याने पोलिसांनी मागच्या बाजूने वाहने सोडण्यास सुरुवात केली. वाहनांनी थेट रिव्हर्स गिअर घेत तीन तासांहून जास्तीच्या कोंडीतून शांतपणे मार्ग काढल्याचे दिसून आले.

रात्री खाण्या-पिण्याच्या गैरसोयीसह अनेकांनी भरपावसात रस्त्यावर ठाण मांडला. शुक्रवारी सायंकाळी आंदोलनासाठी दुसऱ्या दिवसाची मुदतवाढ मिळाल्याचे समजताच मागे फिरलेल्या वाहनांनी पुन्हा यू टर्न घेतला. अनेकांनी थेट सीएसएमटी ते थेट क्रॉफर्ड मार्केट परिसरात दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने पार्क केली. शनिवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात ते आठ वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील रस्त्यावर सकाळीच मराठा आंदोलक पुन्हा एकवटले. आंदोलनाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण मुंबईला पुन्हा बसला. फोर्ट, टपाल कार्यालय, मंत्रालय, नरिमन पॉइंट, गिरगाव, जे. जे. उड्डाणपूल या परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पुन्हा एकदा जे. जे. मार्गपासून भायखळ्यापर्यंत रांगा लागल्या. तीन ते चार बेस्ट बससह खासगी वाहने अडकली. बराच वेळ ताटकळत बसल्यानंतर बसमधील प्रवाशांनी तेथेच खाली उतरून पायी रेल्वेस्थानक, कार्यालये गाठावी लागली.

पोलिसांनी काढली समजूत
कोणी रस्त्यावर झोपले तर कोणी थेट गाण्यावर ठेका धरला. अनेकांनी मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत वाट सोडणार नसल्याचे सांगितले. सह-पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलिस आयुक्त अभिनव देशमुख, पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी समन्वयकांच्या मदतीने त्यांना समजावले.

रस्ता अडविण्याचा प्रयत्न 
विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारी चारच्या सुमारास  पुन्हा बरसायला सुरुवात केली. पुन्हा मराठा बांधव रस्त्यावर उतरले. सीएसएमटी समोरील दोन्ही वाटा अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळ न दवडता पुन्हा वाहने पाठीमागे फिरवत कोंडी सोडविली. गाण्याच्या तालावर मराठा बांधवांनी रस्त्याच्या मध्यभागीच ताल धरत वाहने अडवली.

Web Title: Vehicles in 'reverse gear' to escape traffic jams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.