Vedanta Foxconn Deal: 'आधी कबुली मग भूलथापा', नितेश राणेंनी सुभाष देसाईंचे जुने विधान समोर आणले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 17:29 IST2022-09-14T17:28:09+5:302022-09-14T17:29:52+5:30
Vedanta Foxconn Deal: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातल्या गेल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसंच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत.

Vedanta Foxconn Deal: 'आधी कबुली मग भूलथापा', नितेश राणेंनी सुभाष देसाईंचे जुने विधान समोर आणले
मुंबई: महाराष्ट्रात येणारा वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा 1 लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या सेमीकंडक्टर निर्मितीच्या प्रकल्पातून राज्यात 1 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. दरम्यान, हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातल्या गेल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. भाजप आमदार नारायण राणे यांनी यावरुन तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रापुढे आधी कबूली मग भूलथापा..
— nitesh rane (@NiteshNRane) September 14, 2022
ही आहे ‘फसवी ‘ अदित्य सेना..
ये पब्लिक है सब जानती है.. pic.twitter.com/Wf6R71sMkj
नितेश राणे यांनी ट्विटद्वारे सुभाष देसाई यांच्यावर निशाणा साधलाय. राणे यांनी 2020 सालच्या बातम्यांचा संदर्भ दिलाय, ज्यात सुभाष देसाई या फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत माहिती देताहेत. देसाई यांनी त्यावेळीच सांगितले होते की, हा प्रकल्प महाराष्ट्रात उभा राहणार नाही. आता राणे यांनी त्या बातमीचे स्क्रीनशॉट शेअर करत देसांईवर टीका केलीये. या फोटोसोबत राणेंनी 'महाराष्ट्रापुढे आधी कबूली मग भूलथापा..ही आहे ‘फसवी‘ अदित्य सेना..ये पब्लिक है सब जानती है..,' असे कॅप्शन दिले आहे.
आदित्य ठाकरेंची टीका
हा प्रकल्प गुजरातला नेल्यामुळे माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. 'फॉक्सकॉनबाबत व्हॉट्सअॅपवर खोटो मेसेज फिरवण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी अद्याप सविस्तर उत्तर दिले नाही, सरकारने खुलासाही केला नाही. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला? याचे उत्तर मिळाले नाही. 40 गद्दारांनी सरकार पाडले म्हणून प्रकल्प मागे राहिला. हे घडलं तेव्हा मुख्यमंत्री गणेश दर्शनात व्यस्त होते, आता तरुणांच्या बेरोजगारीची जबाबदारी कोण घेणार?' असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.