“विधान दुर्दैवी, योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”; प्रकाश आंबेडकरांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:57 IST2025-02-28T16:56:46+5:302025-02-28T16:57:54+5:30
Prakash Ambedkar News: असंवेदनशील मंत्री योगेश कदमांना मंत्रिमंडळात का ठेवावे? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला विचारला पाहिजे, असे सांगत प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केला.

“विधान दुर्दैवी, योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”; प्रकाश आंबेडकरांचा संताप
Prakash Ambedkar News: स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात तीन दिवसांनंतर अखेर पोलिसांना यश आले आहे. आरडाओरडा केला नाही म्हणून अत्याचार झाला. विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेशी काहीतरी गोड बोलतो. काहीतरी दीड-दोन, चार मिनिटांमध्ये ब्रेन वॉशिंग करतो. त्यानंतर घडलेल्या घटनेची आपल्याला माहिती आहे. परंतु, अशावेळी तिथे कोणतीही हाणामारी, तिथे कोणतेही आरडाओरडा, कुठलेही फोर्स, असे काही घडलेले नाही, असे बेजबाबदार वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली.
पोलिसांना एक आरोपी पकडण्यासाठी श्वान पथकाची गरज लागते. शंभर पोलिसांची गरज लागते. अनेक अधिकारी त्यांना लागले अशी परिस्थिती आहे. यावरून एकच स्पष्ट होत आहे की, पोलीस खाते कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याच्या ऐवजी अजून काय काय करते? याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा
पुण्याच्या घटनेसंदर्भात योगेश कदम यांनी जे संवेदनशील वक्तव्य केले, ते दुर्दैवी आहे. कुठल्याही घटनेवर सामान्य माणूस शोक व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो. परंतु, मंत्रिपदावर बसलेले मंत्री असे वक्तव्य करतात. त्यातून पोलीस खात्याला आणि आरोपीला बळ मिळते. असंवेदनशील मंत्री योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावे? हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे. योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, योगेश कदम जे बोलले, त्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला हवे. योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते की, हा गजबजलेला परिसर आहे, आजूबाजूला बरेच लोक होते, ती बस आतमध्ये कुठे उभी नव्हती, तर बाहेरच होती. पण, ही घटना घडतेय हे लोकांच्या लक्षात आले नाही, असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असा माझा समज आहे. तथापि, योगेश कदम नवीन आहेत. तरुण मंत्री आहेत. काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईन की, अशा प्रकरणात बोलताना थोडे जपून, संवेदनशीलपणे बोलले पाहिजे. आपण बोलताना चूक झाली, तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. कोणत्याही लोकप्रतिनिधीने या अशा घटनांवर बोलताना संवेदनशीलपणे बोलले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.