Vidhan sabha 2019 : वंचितची पहिली यादी जाहीर; प्रकाश आंबेडकरांनी केले शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 16:35 IST2019-09-24T16:24:19+5:302019-09-24T16:35:49+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : एमआयएमने वंचितसोबत आघाडी तोडत वेगळी चूल मांडली होती.

Vidhan sabha 2019 : वंचितची पहिली यादी जाहीर; प्रकाश आंबेडकरांनी केले शिक्कामोर्तब
मुंबई : विधानसभेसाठी साथ सोडणाऱ्या एमआयएमवर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने कुरघोडी केली आहे. पहिल्याच यादीमध्ये 22 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर एमआयएमला अद्याप दोन याद्यांमधून सातच उमेदवार घोषित करता आले आहेत.
वंचितची पहिली यादी जाहीर https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) September 24, 2019
एमआयएमने वंचितसोबत युती तोडत वेगळी चूल मांडली होती. यानंतर एमआयएमने दोन याद्या जाहीर केल्या होत्या. मात्र, तरीही वंचित आघाडीसाठी प्रतिक्षेत होती. मात्र, आज प्रकाश आंबेडकर यांनी अखेर वंचितची पहिली यादी जातीचा उल्लेख करत जाहीर केली.
कर्जत जामखेडमधून अरुण जाधव, लातूर शहरातून मनियार राजासाब, जळगावमधून शेख शफीअब्दुल नबीशेख, शिवाजीनगर अनिल कुऱ्हाडे यासह 22 मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये पुण्यातील जागांचाही समावेश आहे.
मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने वंचित बहुजन आघाडीसोबत काडीमोड घेतल्यानंतर स्वबळाची तयारी सुरू केली. एमआयएमने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत तीन उमेदवारांचा समावेश होता. एमआयएमची पहिली यादी १० सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. यामध्ये पुण्याच्या वडगाव शेरी येथून डॅनियल रमेश लांडगे, मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून मुफ्ती मोहंमद इस्माईल, नांदेड (उत्तर) मधून मोहंमद फेरोज खान (लाला) यांची नावे जाहीर झाली होती. दुसऱ्या यादीत चार जणांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून अॅड. शंकर भगवान सरगर, सोलापूर मध्य मधून फारुक मोहंमद शाहबदी, सोलापूर दक्षिणमधून महिला उमेदवार देण्यात आल्या आहेत. सोफिया तौफिक शेख या उमेदवार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट येथून हिना शफिक मोमीन यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ अनुसूचीत जातीसाठी राखीव आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये एमआयएमने दोन याद्या जाहीर करून आघाडी घेतली आहे.