Delhi Assembly Elections Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवत भाजपने आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा दारुण पराभव केला. भाजपने २७ वर्षांनी दिल्लीत सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे, दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी काँग्रेसला एकही जागा मिळवता आलेली नाही. या निवडणुकीत इंडिया आघाडीत एकत्र असलेल्या काँग्रेस आणि आपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता निकालानंतरी काँग्रेसने आपवर निशाणा साधला होता. यावरुनच वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येताच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेस आणि आपवर निशाणा साधायला सुरुवात केली होती. त्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी आपवरच टीका केली. आपला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आमची नाही, आम्ही राजकीय पक्ष आहोत, असं सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या. सुप्रिया श्रीनेत यांच्या या विधानावरुन वंचित बहुजन आघाडीने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ढोंगीपणालाही मर्यादा असतात, असं वंचित बहुजन आघाडीने म्हटलं आहे.
"आम्ही आम आदमी पार्टीला विजयी करण्याची जबाबदारी घेतलेली नाही. आम आदमी पार्टीला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आमची नाही. आम्ही एनजीओ नाही, आम्ही एक राजकीय पक्ष आहोत," असं सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं. त्यावर वंचित बहुजन आघाडीने एक्स पोस्टवरुन सुप्रिया श्रीनेत यांच्यावर हल्लाबोल केला.
"व्वा, ताई, व्वा! ढोंगीपणालाही मर्यादा असतात. लोकसभा निवडणुकीनंतर वंचितने काँग्रेसचा कसा पराभव केला याचे विश्लेषण करणाऱ्या याच महिला आहेत. पण काय करताय साहेब! आम्ही एका छोट्या जातीचे आहोत. आम्ही वंचितांचा आणि बहुजनांचा आवाज उठवतो. बी-टीम म्हणून शिव्या फक्त आम्हालाच देण्यात येतात आणि लोक त्यांना राजकीय पक्ष म्हणतात. हा जातिवाद नाही तर काय आहे?", असा सवाल वंचित बहुजन आघाडीने विचारला आहे.
आप आणि काँग्रेसने एकत्र यायला हवे होते - संजय राऊत
"महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीतही राबवण्यात आला. मतदार यादीत घोळ झाला आहे. निवडणूक आयोग शांत बसला होता. काँग्रेस आणि आप यांच्यात युती झाली असती तर बरे झाले असते. 'आप' आणि काँग्रेसमध्ये युती व्हायला हवी होती, असे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो. भाजपचा पराभव करण्यासाठी आपण एकत्र यायला हवे होते," असं संजय राऊत यांनी म्हटलं.