"...तर आपण भिकेला लागू"; संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी वाल्मीक कराड सुदर्शन घुलेमध्ये काय झालं होतं बोलणं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 18:19 IST2025-03-01T18:18:31+5:302025-03-01T18:19:41+5:30
Santosh Deshmukh case Walmik karad CID charge Sheet: वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे सीआयडीने तपासाअंती दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आले आहे.

"...तर आपण भिकेला लागू"; संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी वाल्मीक कराड सुदर्शन घुलेमध्ये काय झालं होतं बोलणं?
Walmik karad CID charge Sheet Santosh Deshmukh case: खंडणीच्या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख हत्येतील प्रमुख आरोपी असल्याचे समोर आले आहे. खंडणीच्या प्रकरणातूनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, असेही सीआयडीच्या तपासातून समोर आला आहे. खंडणीच्या प्रकरणात संतोष देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेमध्ये काय बोलणे झाले होते, याबद्दलही सीआयडीने आरोपपत्रात माहिती दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आवादा कंपनीकडे वाल्मीक कराडने दोन कोटींची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही, तर पूर्ण बीड जिल्ह्यात काम करू देणार नाही, अशी धमकीही दिली होती. या प्रकरणात काम थांबवल्यानंतर संतोष देशमुख यांनी खंडणी मागू नका. आवादा कंपनीच्या लोकांना काम करू द्या. माझ्या गावातील लोकांना मिळेल. पण, संतोष देशमुखांचे म्हणणे आरोपींनी काही ऐकले नाही. त्यानंतर संतोष देशमुख यांनाच त्यांनी टार्गेट केले.
सीआयडीच्या आरोपपत्रात काय?
सीआयडीने जे आरोपपत्र केज न्यायालयात दाखल केले आहे, त्यात म्हटले आहे की, "विष्ण चाटे हा वारंवार संतोष देशमुख यांना कॉल करून खंडणीच्या आड येऊ नको. वाल्मीक अण्णा कराड तुला जिवंत सोडणार नाही, अशी देत होता. याबाबत संतोष देशमुख यांनी त्यांची पत्नी अश्विनी देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख यांना सांगितले."
वाल्मीक कराड म्हणाला, 'आपल्याला कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही'
"७ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुले याने वाल्मीक कराडला कॉल केला. त्यावेळी वाल्मीक कराडने सुदर्शन घुले याला सांगितले की, जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, तर आपण भिकेला लागू. असेच होत राहिले तर आपल्याला कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही. त्यामुळे संतोष देशमुख आडवा येत असेल, तर त्याला कायमचा धडा शिकवा."
नंतर केली संतोष देशमुखांची हत्या
वाल्मीक कराडसोबत बोलणं झाल्यानंतर संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता अपहरण करण्यात आले.
याबद्दल आरोपपत्रात म्हटलं आहे की, "आरोपींनी संतोष देशमुख यांचा पाठलाग केला. त्यानंतर आरोपींनी पांढऱ्या रंगाचे पाईप, लोखंडी रॉड, गॅस पाईप, काठी यांचा वापर मारहाण करण्यासाठी करण्यात आला. चिंचोली टाकळीकडे नेले. तिथे अमानुष मारहाण केली. त्यांचा खून करून साडेसहाच्या सुमारास त्यांचे प्रेत दैठणा फाटा येथे टाकून आरोपी पळून गेले."