वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आता एका पाठोपाठ एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. हुंड्यासाठी वैष्णवी हिचा झालेला छळ, मारहाण आदींबाबत तिच्या माहेरच्या मंडळींनी गंभीर आरोप केल्यानंतर आता वैष्णवी हिची जाऊ आणि हगवणे कुटुंबातील थोरली सून असलेल्या मयुरी हगवणे हिनेही कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत झालेल्या छळाचा पाढा वाचला आहे.
मयुरी हगवणे हिने सांगितले की, २०२२ साली माझं लग्न सुशील हगवणे यांच्यासोबत झालं होतं. लग्नानंतर माझी नणंद, माझा दीर आणि माझी सासू हे कायम माझा छळ करत होते. माझी सासू कधी माझ्यासोबत चांगली वागली तर माझी नणंद तिला म्हणायची की तू तिचे लाड का करतेस, तिचे लाड नाही करायचे, तू तिच्यासोबत असं वाग, तसं वाग म्हणून सांगायची. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्रास दिला जायचा. मात्र सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या पतींचा मला पाठिंबा होता. पण कुटुंबीयांनी माझ्यावरून त्यांनाही खूप त्रास दिला. त्यांनी त्यांच्या मुलालाही सोडलं नाही.
गेल्या दीड वर्षापासून आम्ही वेगळे राहतोय. माझ्या नणंदेने आणि माझ्या दिराने माझ्या चारित्र्यावर संशय घेतला आहे, सासऱ्यांनी माझ्यावर हात टाकलेला होता. आम्ही त्यांच्यापासून वेगळं राहण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी तेही यशस्वी होऊ दिलं नाही. प्रत्येक बाबतीत आम्हाला त्रास दिला जात होता. काही व्यवहार करायचा झाला तर दीर आणि सासरे अडथळे आणायचे. आम्ही त्यांच्या पायाकडे आलं पाहिजे, अशी त्यांची वृत्ती होती, पण आम्ही त्यांच्यासोबत राहिलो नाही, असा आरोपही मयुरी हगवणे हिने केला आहे.