...तर वैष्णवीसोबत असे घडलेच नसते; हगवणेंच्या मोठ्या सुनेच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 11:44 IST2025-05-23T11:42:50+5:302025-05-23T11:44:32+5:30
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे आत्महत्ये प्रकरणात आठवडाभरापासून फरार असलेला तिचा सासरा आणि दिराला पिंपरी चिंचवड पोलिसांनी पहाटे छापा टाकून अटक केली. फरार असले तरी हे दोघे मटणावर ताव मारण्यासाठी पुणे परिसरातील धाब्यांवर, हॉटेलांत बिनदिक्कत जात-येत होते.

...तर वैष्णवीसोबत असे घडलेच नसते; हगवणेंच्या मोठ्या सुनेच्या दाव्याने खळबळ
वैष्णवी हगवणे आत्महत्ये प्रकरणात आठवडाभरापासून फरार असलेला तिचा सासरा आणि दिराला पिंपरी चिंचवड पोलिसांनी पहाटे छापा टाकून अटक केली. फरार असले तरी हे दोघे मटणावर ताव मारण्यासाठी पुणे परिसरातील धाब्यांवर, हॉटेलांत बिनदिक्कत जात-येत होते. वैष्णवीच्या मोठ्या जावेने तिच्या पतीला व सासऱ्याला अटक केल्यावरून प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये तिने पोलिसांनी तेव्हा आपण दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई केली असती तर वैष्णवीसोबत असे घडलेच नसते, असा दावा केला आहे.
सासऱ्यांसह सासूने छळ, मारहाण केली होती, असा दावा वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी जगताप-हगवणे हिने गुरुवारी केला होता. याविरोधात आपण पोलिसांत तक्रार देखील केली होती, परंतू पोलिसांनी ती घेतली नाही. माझ्या भावाने महिला आयोगाकडे तक्रार केली होती, तेव्हा त्यांनी मदत करतो असे सांगितले होते. तसेच पोलीस गुन्हा दाखल करतील असे सांगितले होते. पोलिसांनी तेव्हाच हगवणेंवर कारवाई केली असती तर आज वैष्णवीवर ही वेळ आली नसती असा आरोप मयुरी यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे बडे प्रस्थ असल्याने पोलिसांनी हगवणे कुटुंबावर कारवाई केली नसल्याचे स्पष्ट होत आहे. वैष्णवीचे बाळ आणण्यास गेलेल्या तिच्या मामांनाही बंददुकीचा धाक दाखविण्यात आला होता. तसेच बाळ देण्यास नकार दिला होता. पोलिसांत गेल्यावर पोलिसांनी तुम्ही कोर्टात जा असे त्यांना सांगितले होते. तसेच बंदूक दाखविणाऱ्या निलेश चव्हाणवरही गुन्हा दाखल केला नव्हता. यामुळे या प्रकरणात पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद आहे.
सासरा दीर पोलिसांच्या ताब्यात...
जेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. अखेर आज पहाटे पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी त्यांचा ठावठिकाणा लागल्यावर पोलिसांनी छापा टाकत दोघांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांना बावधन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथेच वैष्णवी हगवणे हत्येचा गुन्हा नोंद आहे.