मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 19:10 IST2025-09-04T19:07:58+5:302025-09-04T19:10:23+5:30
आयुष्याची ३० वर्ष विरोधात घालवली. सातत्याने संघर्ष केला. कार्यकर्त्यांनी कधीच सत्तेचा उपभोग घेतला नव्हता. आज सत्तापक्षात जाताना त्यांना आनंद होत आहे असं वैभव खेडेकर यांनी म्हटलं.

मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
रत्नागिरी - काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मनसेतून हकालपट्टी करण्यात आलेले कोकणातील नेते वैभव खेडेकर यांच्या भाजपा प्रवेशाची जोरदार चर्चा होती. आज मुंबईच्या भाजपा कार्यालयात खेडेकरांचा पक्षप्रवेश होणार होता. मात्र हजारो कार्यकर्ते, मोठा गाजावाजा करत मुंबईच्या दिशेने कूच करणार इतक्यात हा पक्षप्रवेश स्थगित केल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत वैभव खेडेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, पक्षप्रवेश स्थगित करण्यात आला, थोड्या दिवसांनी सुधारित तारीख लवकर कळवण्यात येईल. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. काल हजारो गाड्यांसह ताफा मुंबईकडे कूच करणार होता. परंतु ओबीसी आणि मराठा आरक्षण यामुळे मुंबईतील वातावरण संवेदनशील असल्याने पक्षप्रवेश कार्यक्रम करू नये अशी भाजपा पदाधिकाऱ्यांची धारणा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्याशी कालच चर्चा झाली. आजचा पक्षप्रवेश स्थगित झाला असून यापेक्षा मोठ्या संख्येने हा पक्षप्रवेश येत्या काही दिवसांत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच आयुष्याची ३० वर्ष विरोधात घालवली. सातत्याने संघर्ष केला. कार्यकर्त्यांनी कधीच सत्तेचा उपभोग घेतला नव्हता. आज सत्तापक्षात जाताना त्यांना आनंद होत आहे. जी कामे होत नव्हती, जो अत्याचार येथे होत होता त्याला वाचा फुटेल. कोकणातील अनुशेष भरून निघेल असे भरघोस काम करू. सत्ताधारी पक्षात जाण्याचा आनंद ओसंडून वाहत होता, तो असाच कायम राहील. माझ्यासोबत येण्यासाठी मी कुठल्याही पदाधिकाऱ्याला पैशाचे आमिष दाखवले नाही. २० वर्ष मी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीत उभा आहे. कुणी कितीही आमिष दाखवले तरीही हा कार्यकर्ता माझ्यासोबत भाजपात येईल. पक्षविरहित राजकारणापासून अलिप्त असणारे अनेक लोक माझ्यासोबत येतील असंही वैभव खेडेकर यांनी म्हटलं.
दरम्यान, मनसेकडून कारवाई झाली, त्याचे दु:ख आहे. मनसेची बिजे इथं रोवली. पक्षात राजकीय भाग वगळता अनेकांशी मैत्रीचे संबंध झाले. अविनाश जाधव, संदीप देशपांडे, दिलीप धोत्रे, बाळा नांदगावकर, सचिन भोळे, मनोज चव्हाण या सगळ्यांशी कौटुंबिक संबंध होते. एकमेकांच्या साथीला होतो, ही नाती तुटताना अस्वस्थ होतो. कायमस्वरूपी राज ठाकरेंवर निष्ठा आहे आणि आदर कायम राहील. त्यांनी मला हृदयातून काढून टाकले तरीही माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक कोपरा कायम राहील. मी माझ्या व्यथा मांडल्या, दुर्दैवाने माझी भेट राज ठाकरेंसोबत झाली नाही. हे शल्य माझ्या मनात आहे. माझ्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले. भेट का झाली नाही याचे कारण साहेबच सांगू शकतील. संवाद झाला असता तर निश्चित मार्ग निघाला असता. संवाद न झाल्याने दुरावा निर्माण झाला अशी खंत वैभव खेडेकर यांनी व्यक्त केली.