वडेट्टीवारांच्या वक्तव्याने काँग्रेसमधील बेबनाव पुन्हा समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:10 IST2026-01-02T12:09:43+5:302026-01-02T12:10:34+5:30
...आता उमेदवार नसल्याचे ऐनवेळी वंचितने सांगितल्यामुळे आमची धावपळ उडाली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

वडेट्टीवारांच्या वक्तव्याने काँग्रेसमधील बेबनाव पुन्हा समोर
मुंबई : युतीत वंचित बहुजन आघाडीच्या वाट्याला आलेल्या एकूण जागांपैकी १६ जागा वंचितने काँग्रेसला परत दिल्याच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांच्या वक्तव्याने काँग्रेसमध्येच अंतर्गत बेबनाव असल्याचे पुन्हा दिसून आले आहे. आमच्याकडे १६ जागांवर उमेदवार नाहीत, त्यामुळे त्या जागा तुम्ही घ्या, असे बुधवारी वंचितने काँग्रेसला कळवले होते. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, युती करताना आम्हीही तडजोडी केल्या. आता उमेदवार नसल्याचे ऐनवेळी वंचितने सांगितल्यामुळे आमची धावपळ उडाली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
दोन्ही पक्षांतील बेबनावाच्या चर्चा सुरू झाल्यानंतर बुधवारी ‘वंचित’चे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी बेबनाव नसल्याचे स्पष्ट केले होते. याचवेळी आमच्याकडे काँग्रेसने दिलेल्या १६ जागांवर उमेदवार नसल्याचे स्पष्ट करून या जागा तुम्ही लढवाव्यात, असे आम्ही काँग्रेसला कळवले होते. त्याला काँग्रेसने मान्यता दिली होती, असे मोकळे यांनी स्पष्ट केले. एकीकडे वंचितच्या विरोधात वडेट्टीवार नाराजीचा सूर आळवत असताना दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबईचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मात्र या वादावर फारसे न ताणता वंचित आणि काँग्रेसमधील वाद वाढू न देण्याच्या दृष्टीने सामंजस्याची भूमिका मांडली.
वंचितबरोबर युती झाली नसतानाही वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी, आमची वंचितसोबत युती झाली आहे, असे परस्पर जाहीर करून टाकले होते. त्यावर ‘वंचित’ने वडेट्टीवार यांच्यावर टीका
केली होती.
मुळात वंचित आणि काँग्रेसमधील युती आणि जागा वाटपाबाबत वडेट्टीवार यांच्याकडे कोणतीही भूमिका काँग्रेस पक्षाने दिलेली नाही. जागा वाटपाच्या बोलणीसाठी सचिन सावंत आणि आणखी दोन सदस्यांची नियुक्ती केली होती. त्याहीवेळी जागा वाटपाची अजून प्राथमिक बोलणी सुरू असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले होते.
आज कळणार नेमके किती उमेदवार रिंगणात ?
काँग्रेसने आतापर्यंत फक्त १३९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. २६ उमेदवारांची यादी अजूनही गुलदस्त्यात आहे. याचा अर्थ काँग्रेसकडेही २६ उमेदवार नाहीत की काय? असा अर्थ काढला जात आहे. यावर भाष्य करणे मात्र काँग्रेस टाळत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि वंचितकडे नेमके किती उमेदवार आहेत, हे उद्या, शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर स्पष्ट होईल.