मेट्रोपेक्षा आधुनिक आणि आरामदायी, लवकरच मुंबईकरांसाठी धावणार २३८ नव्या एसी लोकल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 06:50 IST2026-02-03T06:49:37+5:302026-02-03T06:50:58+5:30
Mumbai AC Local: मुंबईची 'लाईफलाईन' आता अधिक हायटेक होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

मेट्रोपेक्षा आधुनिक आणि आरामदायी, लवकरच मुंबईकरांसाठी धावणार २३८ नव्या एसी लोकल!
मुंबईकरांसाठी २३८ नवीन एसी लोकल दाखल होणार असून, त्या मेट्रोपेक्षा आधुनिक आणि आरामदायी असतील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे दिली. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २३,९२६ कोटींची तरतूद करण्यात आली असून सध्या राज्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
एसी लोकलसाठी निविदा काढण्यात आली आहे. लोकलची गर्दी लक्षात घेऊन प्रवास सुसह्य हाेण्याच्या दुष्टीने डब्यांची अंतर्गत रचना करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांची नवी लाइफलाइन मेट्रोपेक्षा अधिक सक्षम, जलद आणि आरामदायी असेल, असा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला. रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, “फलाटांची लांबी वाढवण्याचेही काम सुरू आहे. १५ डब्यांच्या लोकलसाठी हे फायदेशीर ठरेल. सध्या दररोज ३,४०० लोकल फेऱ्या सुरू आहेत. तसेच पाचव्या सहाव्या मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. त्यामुळे लोकलची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.”
मुंबई-अहमदाबाद पहिली बुलेट ट्रेन पुढील वर्षी धावणार
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ पर्यंत सुरू होणार आहे. ती गुजरातमध्ये पहिल्यांदा धावणार आहे. सुरुवातीला १ ते २ तासांच्या अंतराने आणि मागणी वाढल्यास पीक अवरमध्ये १५ मिनिटांत एक ट्रेन चालवली जाऊ शकते. तिकीटदर सर्वसामान्यांना परवडणारे असतील, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
राज्यासाठी दोन नवीन बुलेट ट्रेन प्रकल्प मंजूर
राज्यासाठी दोन नवीन बुलेट ट्रेन प्रकल्प मंजूर करण्यात आले असून मुंबईहून पुण्याला अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचता येईल. आयटी, स्टार्टअप्स आणि औद्योगिक क्षेत्रासाठी बुलेट ट्रेन फायदेशीर ठरेल. पहिल्या टप्प्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होईल, तर दुसऱ्या टप्प्यात ७ नवीन बुलेट ट्रेन प्रकल्पांसाठी तरतूद केली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.