...तोपर्यंत नवीन समीकरण उभं राहू शकत नाही; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 15:40 IST2022-11-24T15:39:51+5:302022-11-24T15:40:43+5:30
उद्धव ठाकरेंसोबत जो कार्यक्रम झाला तो अराजकीय होता. आम्हाला सोबत घ्यायचं की नाही ते त्यांनी ठरवावं असं त्यांनी सांगितले.

...तोपर्यंत नवीन समीकरण उभं राहू शकत नाही; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. कुणी बैठका घेतंय, तर कुणी मेळावे. विविध पक्षातील नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. अलीकडेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे एकाच व्यासपीठावर आले होते. ठाकरे-आंबेडकर या नेत्यांनी उघडपणे एकमेकांसोबत आले पाहिजे अशी विधाने केली. तेव्हापासून राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र याबाबत वंबिआचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मोठं विधान केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेस-शिवसेना ठाकरे गटाला आम्ही युतीसाठी ऑफर दिली होती. परंतु अधिकृतरित्या दोन्ही पक्षांकडून आम्हाला अद्याप काहीही कळवण्यात आलं नाही. उद्धव ठाकरेंसोबत जो कार्यक्रम झाला तो अराजकीय होता. आम्हाला सोबत घ्यायचं की नाही ते त्यांनी ठरवावं असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्वत:चे पॅनेल उभे करून लढणार आहे. महाविकास आघाडी काय करतेय कुणाला माहिती नाही. त्यांचे ठरत नाही तोवर नवीन समीकरण उभी राहतील असं वाटत नाही. काँग्रेस-ठाकरे गटाने मिळून आम्हाला प्रस्ताव दिला तरी आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
५० टक्के सरपंचपदाच्या जागा लढवू
मागच्या २ महिन्यापासून कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुका कशा लढायच्या याची तयारी करून घेतली. सर्व तालुकाध्यक्षांना मुंबईत बोलावलं. ५० टक्क्यांहून अधिक सरपंचपदाच्या जागा लढवल्या जातील असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.