५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 07:14 IST2025-10-25T07:12:19+5:302025-10-25T07:14:14+5:30
२८ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर शनिवार व रविवार असे दोन दिवस पावसाचा अंदाज असतानाच हवामानातील बदलामुळे काही भागातही पावसाची शक्यता आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
ऑक्टोबर हिटचे चटके देणारा सूर्य आग ओकत असल्याने मुंबईत दिवसा घामाने तर रात्री पावसाने आंघोळ होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी ७ नंतर मुंबईसह लगतच्या परिसरात पडलेल्या जोरदार पावसाने एक तासाहून अधिक मुंबईला झोडपून काढले.
संध्याकाळी साडेसातपूर्वी नवी मुंबईसह लगतच्या परिसरात हजेरी लावलेल्या पावसाने आपला रोख मुंबईकडे वळवला. मेघगर्जनेसह दाखल झालेल्या पावसाने साडेसातनंतर जोर पकडला. फोर्ट, मशीद बंदर, कॉटन ग्रीन, वरळी, भायखळ्यासोबत कांदिवली, बोरीवली, पवई आणि अंधेरीत पावसाने शहराच्या वेगात व्यत्यय आणला.
पुढील दोन दिवस सरींचे
अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे हवेतील ओलावा वाढत असून मेघगर्जनेसह अवेळी पाऊस कोसळत आहे. शनिवारसह रविवारीही मुंबईसह लगतच्या परिसरांना पावसाचा इशारा आहे. पुढील आठवड्यातील सुरुवातीचे दिवस मुंबई ढगाळ राहणार असून, पावसाचा अंदाज कायम आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली.
या जिल्ह्यात यलो अलर्ट
२५ ऑक्टाेबर : नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर
२६ ऑक्टाेबर : मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड
२७ ऑक्टाेबर : धुळे, मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर
२८ ऑक्टाेबर : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि नांदेड