राज्याला पुन्हा अवकाळी पाऊस; गारपिटीचा तडाखा, फळबागांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 07:36 IST2021-04-15T01:18:03+5:302021-04-15T07:36:49+5:30
Unseasonal rains : पुण्यात वेल्हे तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील किल्ले राजगड, तोरणा परिसरात पावसाचा जोर अधिक होता.

राज्याला पुन्हा अवकाळी पाऊस; गारपिटीचा तडाखा, फळबागांचे नुकसान
सातारा/नाशिक : ऐन उन्हाळ्यात राज्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. सातारा, पुणे, नाशिक, जळगाव, अहमदनगरसह राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारी, कांदा, भुईमूग, द्राक्षे, आंबा तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पुण्यात वेल्हे तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील किल्ले राजगड, तोरणा परिसरात पावसाचा जोर अधिक होता. पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.
साताऱ्यात शेतामध्ये साचला बर्फाचा थर
सातारा जिल्ह्यातील वाठारजवळील पिंपोडे बुद्रुक, माण तालुक्यातील काही भागाला बुधवारी दुपारच्या सुमारास गारपिटीने झोडपून काढले. गारपिटीमुळे रस्त्यावर बर्फाचा थर जमा झाला होता. गारांमुळे आंबा, कलिंगड, कांदा व तरकारी पिकांचे नुकसान झाले. पाण्याची गरज असलेल्या ऊस, आले या पिकांना मात्र याचा फायदा झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.