राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 07:21 IST2025-10-27T07:21:26+5:302025-10-27T07:21:26+5:30
आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
मुंबई: ऐन दिवाळीत राज्याच्या विविध भागात कमीअधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली असताना शनिवारी रात्री व रविवारी राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला. या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी केली आहे. उत्तर विदर्भासह खान्देशात पावसाचा जोर अधिक होता. आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिकला चोवीस तासांत २९ मिमी
नाशिक शहरासह जिल्ह्यात शनिवारपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. शनिवारी शहरात रात्रभर संततधार सुरू होती रविवारी (दि. २६) दिवसभर हलक्या-मध्यम सरींचा वर्षाव शहरात सुरूच होता. मागील चोवीस तासांत शहरात २९ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यात २७.१ मिमी पावसाची नोंद
नंदुरबार : जिल्ह्यात शनिवारी रात्री आणि रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. धडगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. पावसामुळे चांदसैली घाटात दरड कोसळली असून वाहतूक ठप्प आहे. शिवाय शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाभरात पावसाची रिपरिप सुरू होती. २४ तासात सरासरी २७.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने विदर्भावर अवकाळीचे ढग जमा झाले आहेत. हे सावट पुढचे चार-पाच दिवस राहणार असल्याचा अंदाज आहे. रविवारी चक्रीवादळ व दि. २८ तारखेला पुन्हा तीव्र चक्रीवादळ तयार हाेणार असल्याने विजा व गडगडाटासह पावसाचा जाेर आणखी वाढण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पावसामुळे कपाशी, सोयाबीनला फटका
अकोला जिल्ह्यासह पश्चिम वऱ्हाडात सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: सोंगणी सुरू असलेल्या सोयाबीनसह कपाशी पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. भिजलेल्या सोयाबीनला आता बाजारात दर मिळणे कठीण झाले आहे.
ढगाळ वातावरण आणि अधूनमधून कुठे मुसळधार, तर कुठे रिमझिम पाऊस सुरू आहे. रविवारी सायंकाळीसुद्धा अकोला शहर व परिसरात पावसाच्या सरी आल्या. या पावसामुळे कपाशी आणि सोयाबीन पिकांना फटका बसला. पावसामुळे काढणी करून ठेवलेले सोयाबीन भिजले. कपाशीची बोंडे भिजली असल्याने वेचणी रखडली आहे.