अवकाळी संकटाने घेतले पाच जीव; मराठवाड्याला पावसाने झोडपले, वीज पडून ३ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 06:47 IST2024-04-22T06:46:41+5:302024-04-22T06:47:08+5:30
शहर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली

अवकाळी संकटाने घेतले पाच जीव; मराठवाड्याला पावसाने झोडपले, वीज पडून ३ मृत्यू
लातूर/नांदेड : मराठवाड्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि काही भागात जोरदार पाऊस झाल्याने पिके आणि पशुधनाचे नुकसान झाले. विविध दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन जण वीज पडून मृत्युमुखी पडले आहेत.
अजनसोंडा खु. (ता. चाकूर, जि. लातूर) येथील मंगलबाई अशोकराव पाटील (६५), नळेगाव येथील सार्थक संतोष ढोले (२०) हे शेतात असताना वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. विविध ठिकाणी १६ जनावरेही दगावली आहेत. तळेगाव (निमजी, ता.नांदेड) येथे वीज पडून संजय त्र्यंबक जोगदंड (३५) यांचा मृत्यू झाला.
चिमुकली अन् कामगार दगावला
छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरील सोलर वॉटर हिटरचे पॅनल पडल्याने गरम पाण्यामुळे होरपळून आदिती दीपक झा या चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत इमारतीच्या आडोशाला थांबलेले शैलेंद्र तिडके (४८) यांचा डोक्यात पत्र्याच्या शेडवरील दगड पडून मृत्यू झाला.
१०० पेक्षा अधिक कारखान्यांना फटका
वाळूज महानगर (छत्रपती संभाजीनगर) : शहर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे साधारण २४ तास वीजपुरवठा खंडित राहिला. यामुळे १०० पेक्षा अधिक कारखान्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज उद्योजकांनी व्यक्त केला आहे.