“जोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील”: रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 15:17 IST2026-03-08T15:13:21+5:302026-03-08T15:17:57+5:30
Union Minister Ramdas Athawale News: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा लवकरच राष्ट्रीय पक्ष होणार आहे. भाजपाला आमच्या पक्षाची मदत होते, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

“जोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील”: रामदास आठवले
Union Minister Ramdas Athawale News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयारी केलेली राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत याबाबत खोटे नॅरेटीव्ह सेट केले होते. त्याचा फटका निवडणुकीत बसला. आता मात्र विरोधकांना केंद्रात सत्तेत येण्याची कोणताही संधी मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व समाजांचा पाठिंबा असलेले नेते आहेत. ते अतिशय चांगला कारभार करत आहेत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नमूद केले.
भारतीय संविधान सर्वसामावेशक आणि व्यापक हेतू असलेले आहे. त्यामुळे भारताची स्थिती कधीही श्रीलंका, बांगालदेश आणि नेपाळ या देशांसारखी होणार नाही. रिपब्लिकन चळवळीची विचारधारा अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, बंधूता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर चालत वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी काम करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
जोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील
रामदास आठवले महाराष्ट्रातून राज्यसभेवर जात आहेत. जोपर्यंत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, तोपर्यंत मी मंत्री असेल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा लवकरच राष्ट्रीय पक्ष होणार आहे. भाजपाला आमच्या पक्षाची मदत होते. मी त्यांच्यासोबत जोपर्यंत आहे, तोपर्यंत मोदी हेच पंतप्रधान राहतील, असा दावा रामदास आठवले यांनी केला.
दरम्यान, मी संसदेत बसून चारोळ्या करतो. त्यामुळे माझे जगभरात फॅन तयार झाले आहेत. माझी लोकप्रियता सतत वाढत आहे. मी ज्यांच्यासोबत असतो ते सत्तेत असतात. मी सोबत असलो की त्या पक्षाला १०० टक्के सत्ता मिळते, हा आजवरचा पायंडा आहे. त्यात बदलाची शक्यता अजिबात नाही, असेही ते म्हणाले.