साखर कामगारांचे प्रश्न न सोडवल्यास ग्रामीण भागात बेरोजगारी वाढेल : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:28 IST2025-09-19T12:28:33+5:302025-09-19T12:28:50+5:30

कारखान्याची गाळप क्षमता वाढली, पण कामगार संख्या तीच

Unemployment will increase in rural areas if sugar workers issues are not resolved says Sharad Pawar | साखर कामगारांचे प्रश्न न सोडवल्यास ग्रामीण भागात बेरोजगारी वाढेल : शरद पवार

साखर कामगारांचे प्रश्न न सोडवल्यास ग्रामीण भागात बेरोजगारी वाढेल : शरद पवार

पन्हाळा (जि. कोल्हापूर) : साखर धंद्यात कामगार हा महत्त्वाचा असून, कामगारांच्यात स्थिरता येणे गरजेचे आहे, पण सध्या कारखान्यांचे खासगीकरण सुरू आहे. त्यामुळे कामगारांचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. राज्य शासनाने कामगारांचे प्रश्न सोडवले नाही तर ग्रामीण भाग बेरोजगार होईल, अशी चिंता माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

पन्हाळा येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या तीन दिवसीय शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अर्थमंत्री व आमदार जयंत पाटील होते.

पवार म्हणाले, अशा शिबिरातून कामगार कायदे व साखर उद्योगाची सद्य:स्थिती जाणून घेतात. म्हणूनच मी खात्रीने सांगतो साखर धंदा, ऊसउत्पादक शेतकरी व कष्ट करणारा कामगार या तिघांच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल. सध्या जमिनीचे क्षेत्र कमी झाले आहे. कारखानदारीमुळे साखर धंदा वाढत आहे; पण त्यातही बदल होत पूर्वी बाराशे ते दोन हजार गाळप क्षमता असलेल्या कारखान्यात कामगार संख्या दोन हजार होती. आज त्याच कारखान्याची गाळप क्षमता वाढली, पण कामगार संख्या तीच आहे. त्यामुळे कष्टकरी कामगाराला दिवसेंदिवस नवीन व्यवसाय शोधावा लागत आहे. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार कारखानदार व कामगार संघटनांनी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.

अध्यक्षीय भाषणात जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात साखर कामगारांची आव्हाने मोठी झाली आहेत. कामगारांबरोबरच शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. सध्या साखर कारखान्यात ४० टक्के कामगार कंत्राटी असल्यामुळे मूळ कामगारांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. कामगारांच्या हितासाठी संघटित झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Unemployment will increase in rural areas if sugar workers issues are not resolved says Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.