अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खेडमधील मालमत्तांचा ४ नोव्हेंबरला लिलाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:28 IST2025-10-31T13:27:30+5:302025-10-31T13:28:10+5:30
लिलावातून सरकारला किती महसूल मिळणार.. जाणून घ्या

संग्रहित छाया
खेड (जि. रत्नागिरी) : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या नावावर असलेल्या खेड तालुक्यातील मुंबके गावातील मालमत्तेचा ४ नोव्हेंबर रोजी लिलाव करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या अधिनस्त स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स ॲक्ट (साफेमा) या संस्थेकडून ही कारवाई केली जाणार आहे.
या लिलावात दाऊदच्या नावावरील जमीन, घरे आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश असून, लिलाव प्रक्रिया ऑनलाइन आणि प्रत्यक्ष उपस्थितीत अशा दोन्ही माध्यमांतून पार पडणार आहे. जानेवारी २०२४ मध्ये दाऊदच्या नावावरील सुमारे १७३० चौ. मी. जमीन लिलावासाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी दिल्ली स्थित वकील अजय श्रीवास्तव यांनी सर्वाधिक बोली लावली होती. मात्र, पारदर्शकतेविषयी प्रश्न निर्माण झाल्याने ती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.
दाऊदच्या मालमत्तेसह त्याची आई अमीनाबी परकार हिच्या नावावर असलेल्या दोन जमिनींचा लिलाव होणार आहे. या लिलावातून सरकारला अंदाजे २० लाख रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
वेगवेगळे लिलाव
याआधीही २०१७, २०२०, २०२४ मध्ये दाऊदच्या मालमत्तेचे लिलाव झाले आहेत. २०२४ मध्ये मुंबके येथील चार मालमत्तांचे लिलाव लावण्यात आले होते. त्यातील १७१ स्क्वे. मी.चा शेतजमिनीचा प्लॉट आणि १,७३० स्क्वे. मी.चा दुसरा प्लॉट हे ॲड. अजय श्रीवास्तव यांनी लिलावात घेतले. इतर मालमत्ता सर्वोच्च न्यायालयातील वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी खरेदी केल्या आहेत.
२०२४ मध्ये चार मालमत्तांचा लिलाव लावण्यात आला होता. त्यातील दोन लिलावात विकल्या गेल्या. मात्र, नंतर त्याला स्थगिती देण्यात आली. आता त्या मालमत्तांसह अन्य दोन अशा चार मालमत्तांचा लिलाव होणार आहे.