सौरऊर्जा गाव करा, एक कोटीचे अनुदान मिळवा; राज्यात ६३ गावांची निवड
By भीमगोंड देसाई | Updated: July 10, 2025 18:00 IST2025-07-10T17:59:08+5:302025-07-10T18:00:28+5:30
प्रत्येक जिल्ह्यात एक होणार मॉडेल सौर गाव

सौरऊर्जा गाव करा, एक कोटीचे अनुदान मिळवा; राज्यात ६३ गावांची निवड
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल सौर ग्राम निर्माण करण्यात येणार आहे. यासाठीच्या स्पर्धेसाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा जिल्ह्यांतील ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. यशस्वी गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. सहा महिन्यांत स्पर्धेतील गावांपैकी सर्वाधिक सौरऊर्जा क्षमता निर्माण करणाऱ्या गावाची विजेता म्हणून निवड करण्यात येणार आहे.
राज्यातील शंभर गावे सौरऊर्जेच्या वापरावर स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी आतापर्यंत १४ गावे सौर ग्राम झाली आहेत. केंद्र सरकारच्या मॉडेल सौर ग्राम योजनेमुळे गावांना ऊर्जा स्वयंपूर्ण बनविण्यास चालना मिळणार आहे. मॉडेल सौर ग्राम योजनेसाठी महावितरण नोडल एजन्सी आहे. किमान पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावांना मॉडेल सौर ग्राम योजनेसाठीच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी आहे. विविध जिल्ह्यांमध्ये गावे निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सध्या सहा जिल्ह्यांतील ६३ गावांची योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना घरोघरी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्या गावातील पथदिवे, पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालवण्यात येणार आहे. यासाठीच्या स्पर्धेचा कालावधी संपल्यानंतर त्या-त्या गावात एकूण किती सौरऊर्जा क्षमता निर्माण झाली याचा अभ्यास करून जिल्ह्यातील विजेत्या गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
जिल्हानिहाय निवड झालेल्या गावांची संख्या अशी...
मॉडेल सौर ग्राम योजनेसाठी अकोला जिल्ह्यातील २६, भंडारा येथील ६, बुलढाणा १५, वर्धा येथील ९ आणि गोंदिया जिल्ह्यातील एका गावाची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी या गावांचे परीक्षण नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत करण्यात येणार आहे.
वैयक्तिक लाभार्थीस ७८ हजारांपर्यंत अनुदान
योजनेतील पात्र लाभार्थीस महिना तीनशे युनिटपर्यंतची घरगुती वीज मोफत आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळण्यासाठी घरावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळते. एक किलोवॉटला तीस हजार रुपये, दोन किलोवॉटला साठ हजार रुपये आणि तीन किलोवॉटला ७८ हजार रुपये अनुदान मिळते.