धावत्या रेल्वेतून उतरताना तरूणी सापडली गाडीखाली
By Admin | Updated: September 26, 2016 08:47 IST2016-09-26T08:35:59+5:302016-09-26T08:47:41+5:30
लोणावळा रेल्वे स्टेशनवर धावत्या रेल्वेमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करताना एक युवती पाय घसरून फलाटावर पडली आणि तिचे अर्धे शरीर फलाटाखाली गेले.

धावत्या रेल्वेतून उतरताना तरूणी सापडली गाडीखाली
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. २६ - लोणावळा रेल्वे स्टेशनवर धावत्या रेल्वेमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करताना एक युवती पाय घसरून फलाटावर पडली. तिचे अर्धे शरीर फलाटाखाली गेले असतानाही तेथे उपस्थित लोणावळा शहर पोलिसांनी प्रसंगावधान राखून तिला बाहेर खेचल्याने तिचा जीव वाचला.
रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी काकिनाडा एक्सप्रेस लोणावळा रेल्वे स्थानकात आली. दोन मिनिटांचा थांबा घेऊन गाडी मुंबईच्या दिशेने निघाली. गाडी वेग घेत असतानाच एक वृद्ध व्यक्ती गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात फलाटावर पडली. फलाटावरील काही प्रवाशांनी त्यांना बाजूला घेतले. त्या वेळी तेथे झालेल्या गोंधळाच्या आवाजाने बाजूलाच बसलेले शहरचे पोलीस नाईक राहुल मोरे, कॉन्स्टेबल अजय गायकवाड आणि पवन तायडे हे तिघे पुढे येत होते. त्यांच्या समोरच त्याच धावत्या गाडीच्या दुसºया एका डब्यामधून एक युवक आणि युवती खाली उतरण्याच्या प्रयत्नात फलाटावर पडले. युवक रेल्वेपासून दूर पडला. मात्र, युवती फलाटाच्या खाली खेचली गेली. हे पाहताच कॉन्स्टेबल तायडे यांनी पुढे धावत जाऊन युवतीला बाहेर खेचले. पोलिसांनी धैर्य व प्रसंगावधान राखत युवतीचे प्राण वाचविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.