उल्हासनगर महापालिकेची पाणी बिल दरवाढ रद्द, आयलानी व कलानी समर्थक श्रेयासाठी पुढे सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 21:15 IST2025-08-06T21:14:19+5:302025-08-06T21:15:00+5:30
उल्हासनगर महापालिकेने दुप्पट केलेली पाणी कर दरवाढ रद्द केल्याचे पत्र आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी प्रसिद्ध केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

उल्हासनगर महापालिकेची पाणी बिल दरवाढ रद्द, आयलानी व कलानी समर्थक श्रेयासाठी पुढे सरसावले
उल्हासनगर महापालिकेने दुप्पट केलेली पाणी कर दरवाढ रद्द केल्याचे पत्र आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी प्रसिद्ध केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. पाणीपट्टी दरवाढ रद्द करण्यासाठी सर्वप्रथम ओमी कलानी यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने, पुढील सूत्र हलले असल्याचे बोलले जाते.
उल्हासनगर महापालिका अर्थसंकल्प मध्ये पाणीपट्टीत दुप्पट दरवाढ सुचविली होती. पाणीपट्टी दरवाढीला नागरिकासह राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला. मात्र महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. पाणीपट्टी दरवाढीला उद्धवसेने पाठोपाठ ओमी कलानी टीमने विरोध दर्शवून ओमी कलानी व समर्थकांनी गेल्या आठवड्यात खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन, त्याबाबत निवेदन दिले. महापालिका निवडणुक पाश्वभूमीवर पाणीपट्टी दरवाढीचे श्रेय घेण्यासाठी आमदार कुमार आयलानी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया आदींनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाणीपट्टी दरवाढ कमी करण्याची मागणी करून निवेदन दिले. मंगळवारी सायंकाळी आमदार आयलानी यांनी पत्रकार परिषद घेऊन पाणी दरवाढ रद्द करण्याबाबतची माहिती दिली. महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी बुधवारी पाणीपट्टी दरवाढ रद्द केल्याचे प्रसिद्धपत्रक काढले. पाणी दरवाढ रद्द झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र याचे श्रेय घेण्यासाठी आयलानी व कलानी समर्थक पुढे सर्वसावले आहे.
महापालिका निवडणुक पाश्वभूमीवर पाणीपट्टी दरवाढ रद्द केल्याचे बोलले जात आहे. महापालिकेकडे मालमत्ता कर व पाणीपट्टी कर हे मुख्य उत्पन्नाचे साधन असून पाणी कर दरवाढ रद्द झाल्याने, राज्य शासन महालिकेला विशेष निधी देणार असल्याच्या वावड्याही उठल्या आहेत. मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णासंख्या बघता रुग्णालय ४०० बेडचे करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे.