फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 09:35 IST2025-07-17T09:34:58+5:302025-07-17T09:35:24+5:30

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Face to Face: उद्धव ठाकरे आल्यानंतर सर्वच नेत्यांनी आसनांवरून उठून सन्मान केला. यावेळी एकनाथ शिंदेही आसनावरून उठल्याचे दिसले.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Face to Face: avoided even looking at each other, let alone sitting aside. | फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले

फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना बुधवारी निरोप देण्यात आला. यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर फोटोसेशन ठेवले होते. यादरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वैर पुन्हा एकदा प्रकर्षाने पाहायला मिळाले.

 निरोप समारंभ  फोटोसेशनसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे असे सगळे खुर्च्यांवर बसले होते. 

पलीकडच्या खुर्चीवर
उद्धव ठाकरे आल्यानंतर सर्वच नेत्यांनी आसनांवरून उठून सन्मान केला. यावेळी एकनाथ शिंदेही आसनावरून उठल्याचे दिसले. मात्र, समोरासमोर येऊनही ठाकरे-शिंदे यांनी एकमेकांकडे बघणे टाळले. नीलम गोऱ्हे या शिंदे यांच्या शेजारच्या खुर्चीवर होत्या. प्रोटोकॉलनुसार बसण्याची व्यवस्था होती. तरीही ठाकरे आल्यानंतर गोऱ्हे यांनी उठून शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीवर बसण्याची विनंती त्यांना केली. मात्र, गोऱ्हे यांची ही विनंती नाकारत ठाकरे पलीकडच्या खुर्चीवर जाऊन बसले.  

फडणवीसांशी संवाद
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. पण, एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे तसेच त्यांच्या शेजारीही बसणे टाळले.

आजही मित्रपक्ष पण.. 
दानवे मूळचे भाजपातले आहेत. काही कारणांमुळे पक्षाने त्यांना सोडले. त्यामुळे ते त्यावेळचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेत गेले. खरे तर शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष आहे. मात्र, आता त्यात थोडे बदल झाले आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय अध्यक्षच घेतील
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आल्याने अनिल परब पुढील तयारी करा. विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभेत अध्यक्ष आणि विधान परिषदेत सभापती निर्णय घेतात. विरोधी पक्ष ठरवेल ते आम्हाला मान्य असणार आहे. 
पण, सभापती आणि अध्यक्षांना मान्य असेल तरच त्याचा अंतिम निर्णय होईल. ते सर्वोच्च स्थानी आहेत. मुख्यमंत्री कितीही मोठा असला तरी अध्यक्ष व सभापती यांनी सांगितले तरी त्यांनाही ऐकावेच लागते, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निरोपाच्या भाषणात स्पष्ट केले. 

Web Title: Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Face to Face: avoided even looking at each other, let alone sitting aside.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.