Uddhav Thackeray vs BJP: "उद्धवजी, शिमग्याच्या बोंबा पुरे! रक्ताचे पाट..."; भाजपाने घेतला ठाकरेंच्या आरोपांचा समाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 20:40 IST2023-03-05T20:38:45+5:302023-03-05T20:40:11+5:30
उद्धव ठाकरेंनी खेडच्या सभेत भाजपावर केली होती बोचरी टीका

Uddhav Thackeray vs BJP: "उद्धवजी, शिमग्याच्या बोंबा पुरे! रक्ताचे पाट..."; भाजपाने घेतला ठाकरेंच्या आरोपांचा समाचार
Uddhav Thackeray vs BJP: गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यापासून उद्धव ठाकरे गटातील नेतेमंडळींनी निवडणूक आयोगावर चांगलेच तोंडसुख घेतले आहेत. त्यातच आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा खेड येथे शिवगर्जना मेळावा झाला. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपावर टीका केली. मात्र, उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.
उद्धव ठाकरे आजच्या सभेत म्हणाले, "धूळवड होऊ द्या, त्यानंतर शिवसेनेचा भगवा राज्यात आणि देशात फडकवा. उद्या शिमगा आहे, त्यानंतर धुळवड आहे. त्यानंतर रंगपंचमी आहे. त्यानंतर अशी हुकूमशाही सुरू होईल की तुम्हाला डोकेही वर काढता येणार नाही. क्रांतीकारकांनी रक्त शिंपडून तुमची गुलामगिरी करण्यासाठी स्वातंत्र्य मिळवलेले नाही. अनेक क्रांतीकारकांची नावेही आपल्याला माहिती नाही. गोमूत्र शिंपडून देश स्वतंत्र झालेला नाही, क्रांतीकारकांनी रक्ताचा अभिषेक करून हे स्वातंत्र मिळवले आहे. आपले सैनिक आणि जवान देशाचे रक्षण करतात. देशाचे स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आले आहे. आधी भाजपच्या व्यासपीठावर साधूसंत दिसायचे, आता त्यांच्या सभेत संधीसाधू दिसतात. विरोधी पक्षात असलेले पापी, भ्रष्टाचारी आणि त्यांच्याकडे गेल्यावर ते शुद्ध होतात."
उद्धव ठाकरेंच्या साधूसंतांच्या विधानावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. "भाजपाच्या व्यासपीठावर आधी साधू असायचे, आता संधीसाधू असतात असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या. पालघरची घटना इतक्यात विसरलात का? मारेकऱ्यांना तुम्ही पोटाशी धरले. रक्ताचे पाट तुमच्याच कारकिर्दीत वाहिले. शिमग्याच्या बोंबा पुरे आता.." असे ट्विट करत बावनकुळे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
भाजपाच्या व्यासपीठावर आधी साधू असायचे, आता संधीसाधू - उद्धव ठाकरे
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) March 5, 2023
पालघरची घटना इतक्यात विसरलात?
उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या.
मारेकऱ्यांना तुम्ही पोटाशी धरले.
रक्ताचे पाट तुमच्याच कारकिर्दीत वाहिले.
शिमग्याच्या बोंबा पुरे आता..