“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 12:12 IST2025-07-20T12:10:20+5:302025-07-20T12:12:19+5:30
Uddhav Thackeray Interview: पंतप्रधान मोदी यांच्यानंतर कोण? यावर उद्धव ठाकरेंनी सूचक भाष्य केले.

“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
Uddhav Thackeray Interview: पंतप्रधान मोदी आता पंचाहत्तर वर्षांचे होत आहे. मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदींवर पंचाहत्तरीची शाल घातलेली आहे. त्यामुळे आता बोले तैसा चाले आहे की, वाकडी यांची पाऊले आहेत, हे कळेलच. या सगळ्यांचे प्रमुख मोहन भागवत आहेत आणि तेही आता पंचाहत्तर वर्षांचे होत आहेत. पंतप्रधान मोदी कदाचित निवृत्ती जाहीर करतील. मोदींनंतर कोण हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. या प्रश्नावर त्यांनी उत्तर शोधले असेल किंवा शोधायला सुरुवात केली असेल. त्यांच्याकडे उत्तर असल्याशिवाय ते बोलणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते.
पंतप्रधान मोदी यांच्यानंतर कोण, याबाबत तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न संजय राऊतांनी केला. यावर बोलताना, आपल्याकडे जी लोकशाही आहे. त्यानुसार ज्याचा पक्ष जिंकतो किंवा बहुमत ज्या पक्षाकडे असते, त्या पक्षाचा नेता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होतो. एकदा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो त्या पक्षाचा राहता कामा नये. तो देशाचा किंवा राज्याचा प्रमुख झाला पाहिजे, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
आपण कुठेतरी हा पायंडा तोडला पाहिजे
आपल्याकडे ही पद्धत अर्धी आहे. एकदा नेता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री झाला की, तो त्या पक्षापुरता मर्यादित राहतो. हे घडले आहे. तुम्ही देशाचे पालक आहात. तुम्ही राज्याचे पालक आहात. तुम्ही त्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर मी सर्वांशी समानतेने वागेन, ही शपथ आहे. मीही मुख्यमंत्री म्हणून अशी शपथ घेतली आणि मला वाटते की, तसे वागण्याचा प्रयत्न केला. तसे वागलो की नाही हे तुम्हीच सांगा. पक्षाचा प्रचार करायचा असेल, तर आताच्या प्रथेप्रमाणे मीही केला असेन. परंतु, आपण कुठेतरी हा पायंडा तोडला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मनोहर जोशी जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते, तेव्हा पक्षाच्या कार्यक्रमाला येत नव्हते. दत्ताजी नलावडे हेदेखील पक्षाच्या कार्यक्रमाला येऊन भाषण करत नव्हते. पक्षाकडून काही प्रशिक्षण शिबीर ठेवले, तर ते त्यासाठी यायचे. परंतु, मनोहर जोशी पक्षाच्या जाहीर सभांना लोकसभेचा अध्यक्ष झाल्यावर येत नव्हते. हे पथ्य कुणीतरी सुरू केले पाहिजे. आता सगळे एकतर्फी चाललेले आहे. अद्यापही अपात्रतेचे विषय कशा पद्धतीने हाताळले जात आहेत, ते बघा. शेड्युल १० आहे, त्याची कशी वाताहात लावलेली आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.