“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 09:56 IST2025-11-06T09:53:02+5:302025-11-06T09:56:27+5:30
Uddhav Thackeray News: शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, तर कर्जमुक्ती हवी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
Uddhav Thackeray News: राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक विम्याचे २, ३ रुपये आणि ६ रुपये देऊन थट्टा केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मिळायला पाहिजे, सरकारचे पॅकेज आम्हाला मान्य नाही. मात्र, जे जाहीर केले ते तातडीने द्या, असा हल्लाबोल उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केला. मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ठाकरे हे ४ दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक टोला लगावला.
मुख्यमंत्री म्हणाले की, या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. आता त्यांना उद्या उत्तर देईन. अजून काय म्हणाले की, उद्धव ठाकरे फक्त टोमणे मारतात, विकासावर बोललेले भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा. मग मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही तुमच्या हेलिकॉप्टरने इथेच या आणि विकासाचे बोला, होऊन जाऊ दे. बंधारे फुटत गेले, चला बोला विकासाचे. मराठवाड्यात पाणी नाही, आले तर ते थांबतच नाही अशी स्थिती आहे. काय विकासाचे बोलू मी? कुणासमोर बोलू? जो अन्नदाता आपल्याकडे आशेने पाहतो आहे त्याला काय सांगू उद्या पाच पदरी उड्डाण पूल उभारेन. तुम्ही म्हणाल घाला खड्ड्यात तो उड्डाण पूल. आत्ता काय करू ते सांग. काय विकासाचे बोलू? या शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला.
अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद
यांच्या उद्योगपती मित्रांची कर्जे माफ होत आहेत, ते परदेशात पळत आहेत. तुमच्यापैकी एक जण तरी परदेशात पळू शकतो का? कारण माझ्या शेतकऱ्यांची ती वृत्तीच नाही. घर सोडून फिरणारे हे मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्र संकटात सापडला आहे आणि मुख्यमंत्री बिहारला गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच अजित पवार हे कायम उप असतात. त्यांना अखंड उप भव हा आशीर्वाद दिला आहे, असा टोला ठाकरेंनी लगावला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यातील पाली येथेही शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले. त्यांनी सरकारला 'दगाबाज' म्हणत, निवडणुकीत याच 'दग्याने' प्रत्युत्तर द्या, असा हल्लाबोल सरकारवर चढवला. शेतकरी गुन्हेगार नाही, तो अन्नदाता आहे, त्यामुळे त्याला 'माफी' नको, तर 'कर्जमुक्ती' हवी आहे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा व भूम तालुक्यांतील शेतकऱ्यांशीही संवाद साधला.