“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 15:47 IST2025-05-09T15:37:07+5:302025-05-09T15:47:43+5:30
Sanjay Raut News: गेली दहा वर्षे शरद पवार विरोधी पक्षात आहेत. मंत्रिपद किंवा दुकाने वाचवण्यासाठी आम्हाला सत्ता नको, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
Sanjay Raut News: सत्तेत जावे, असा मानणारा एक गट असतो. हे सगळ्या पक्षात होत असते. आमच्या पक्षात एक गट असा होता की, जो त्यावेळेला वारंवार म्हणत होता की, आमच्यावर ईडीच्या धाडी पडतील, आम्हाला अटक केली जाईल. आमच्या कुटुंबाला त्रास होत आहे. आम्हाला तुरुंगात जावे लागेल. आमच्या संपत्ती जप्त होतील. त्यामुळे आपण भाजपासोबत जाऊ आणि तो गट गेला. सत्तेच्या गुळाला चिकटून राहायचे, असे गट प्रत्येक पक्षात असतात. त्यावर फार चिंता करायचे कारण नाही. पण ती पोकळी भरून निघते. आता देशात युद्धजन्य परिस्थिती असली, तरी विरोधी पक्ष मजबुतीने उभा आहे. ती पोकळी भरून काढायचे काम महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी करत आहे. राहुल गांधी करत आहेत, ज्यांना जायचे असते, ते जात असतात, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. मात्र, हा निर्णय खा. सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, मी त्या प्रक्रियेत नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणासंबंधी विधाने केली. दोन्ही पक्षांचे नेते एकाच विचारधारेतील आहेत. काहींना वाटते, विकासकामे व्हायची असतील तर अजित पवार यांच्याबरोबर जावे, काहींना वाटते जाऊ नये. एकत्र यायचे की नाही याचा निर्णय आमच्या खासदार सुप्रिया सुळे घेतील, असे शरद पवारांनी म्हटले होते. यावर संजय राऊतांनी भाष्य केले.
गेली दहा वर्षे शरद पवार विरोधी पक्षात आहेत
शरद पवार गटातील एकाचे असे म्हणणे आहे की, अजित पवारांसोबत सत्तेत जावे, यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांचे संपूर्ण आयुष्य जसे सत्तेत गेले आहे, तसे विरोधी पक्षातही गेले आहे. लोकशाहीत विरोधी पक्षाला काय स्थान आहे. काय ताकद आहे, हे त्यांना माहिती आहे. गेली दहा वर्षे शरद पवार विरोधी पक्षात आहेत. तरी त्यांचा मान-सन्मान महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे सत्तेत कमी राहिले आणि विरोधात जास्त राहिले. तरीही आमचे राजकारण सुरू आहे. मंत्रिपद किंवा दुकाने, कारखाने वाचवण्यासाठी आम्हाला सत्ता नको, असे संजय राऊत यांनी सांगितले.
ते ऑन द रेकॉर्ड बोलतील, तेव्हा आम्ही ऑन द रेकॉर्ड बोलू
सुप्रिया सुळे आमच्यासोबत दिल्लीत होत्या. आम्ही या विषयावर चर्चा केली. त्यांच्या बोलण्यातून मला असे काही जाणवले नाही. असा काही निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता आहे, असे वाटले नाही. दुसरी गोष्ट अशी की, शरद पवार ऑफ द रेकॉर्ड बोलले आहेत. ते ऑन द रेकॉर्ड बोलतील, तेव्हा आम्ही ऑन द रेकॉर्ड बोलू. ऑफ दे रेकॉर्ड आमच्याकडे खूप माहिती आहे. आता युद्ध सुरू आहे आणि या काळात अशा चर्चा फार रंगवू नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, हे लहान मुद्दे आहेत. महाविकास आघाडीच्या मुद्द्यावर आता मी चर्चा करणार नाही. युद्धाचा निचरा झाला की, या युद्धाकडे आम्ही वळू, असा टोला संजय राऊतांनी लगावला.