उद्धव ठाकरेंनी दाखवली महायुतीची 'ती' जाहिरात, अर्थसंकल्पानंतर काय काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 18:29 IST2025-03-10T18:27:49+5:302025-03-10T18:29:51+5:30
Uddhav Thackeray Maharashtra Budget 2025 News: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाबद्दल बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महायुतीला जुन्या घोषणांची आठवण करून दिली.

उद्धव ठाकरेंनी दाखवली महायुतीची 'ती' जाहिरात, अर्थसंकल्पानंतर काय काय बोलले?
Uddhav Thackeray Maharashtra Budget News: 'तिजोरीमध्ये पैसा नाहीये आणि यांच्या संकल्पालाही काही अर्थ नाहीये. आचार्य अत्रे असते, तर ते असं म्हणाले असते की, गेल्या दहा हजार वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नाही', असे म्हणत शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. यावेळी ठाकरेंनी महायुतीची विधानसभा निवडणुकीवेळची जाहिरात दाखवत, 'मारल्या थापा भारी अन् महाराष्ट्र केला कर्जबाजारी', अशा शब्दात डिवचलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. महायुतीने विधानसभा निवडणुकीवेळी केलेल्या घोषणांची जाहिरात ठाकरेंनी दाखवली.
'काम केलंय भारी नाही, मारल्या थापा भारी', ठाकरे काय बोलले?
उद्धव ठाकरे म्हणाले, "निवडणूक लढवताना काही घोषणा केल्या होत्या. त्याची जाहिरात घेऊन मी आलोय. या जाहिरातींसाठी लाखो रुपयांची उधळण केली गेली. खाली एक वाक्य आहे. हे वाक्य आता बदलायला पाहिजे. 'केलंय काम भारी', आता हे वाक्य म्हणजे मारल्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी. अशी आताची परिस्थिती आहे", असे टीका ठाकरेंनी केली.
'बहुमताचा अपमान करणार अर्थसंकल्प'
"हा जो त्यांचा विजय आहे, निवडणुकांमधला; आमच्या मते बोगस मतदान, ईव्हीएमचा घोटाळा, दुबार मतदान यांचा परिपाक आहे. पण, सरकारला जर वाटतंय की महाराष्ट्रातील जनतेनं बहुमताने निवडून दिलंय. त्या बहुमताचा अपमान करणारा हा अर्थसंकल्प आहे. कारण लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार होते, त्याचा उल्लेख नाहीये", असे ठाकरे अर्थसंकल्पावर बोलताना म्हणाले.
"मी मुख्यमंत्री म्हणून नागपूरच्या अधिवेशनात कर्जमुक्तीची घोषणा करून अमलबजावणी केली होती. लाडक्या बहिणींबद्दलचं यांचं प्रेम दिसलं नाही, पण कंत्राटदारांबद्दलचं प्रेम कायम आहे. लाडक्या कंत्राटदारांसाठी हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राला कर्जबाजारी करणारा पोकळ असा अर्थसंकल्प आहे", अशी टीका ठाकरे यांनी केली.