कुजबुज! दिल्लीच्या निकालानंतर उद्धवसेना, काँग्रेस नगरसेवकांचे मनपरिवर्तन होऊ शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 06:26 IST2025-02-11T06:25:58+5:302025-02-11T06:26:39+5:30

पालिका निवडणुकांसाठी बराच कालावधी असला तरी पक्ष बदल करून नवीन ठिकाणी मोर्चेबांधणीची तयारी करण्याच्या तयारीत अनेक जण असल्याची कुजबुज आहे.  

Uddhav Thackeray Sena, Congress corporators may change their minds after Delhi results for upcoming BMC Election | कुजबुज! दिल्लीच्या निकालानंतर उद्धवसेना, काँग्रेस नगरसेवकांचे मनपरिवर्तन होऊ शकते

कुजबुज! दिल्लीच्या निकालानंतर उद्धवसेना, काँग्रेस नगरसेवकांचे मनपरिवर्तन होऊ शकते

...वहीं से लाईन शुरू होती है

ठाणे जिल्ह्यात शिंदेसेना आणि भाजप यांच्यात शह-काटशहचे राजकारण सुरू आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी आपण पालघरसह ठाणे, नवी मुंबईत जनता दरबार घेणार, ही घोषणा केल्यानंतर ते जास्तच तापले आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी नाईक यांचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईलाच निवडले. नाईक यांचे कट्टर विरोधक रमाकांत म्हात्रेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिंदेसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला नाईक यांच्याच ऐरोली मतदारसंघात एक कार्यक्रम पार पडला. यावेळी ते म्हणाले, आपल्याला जनता दरबार भरवण्याची गरज नाही. क्योंकी हम जहाँ खडे हाेते है, वहीं से लाईन शुरू होती है.

रेल्वेला मराठीचे वावडे

डोंबिवली रेल्वे स्थानकात पादचारी पूल, स्वयंचलित जीने बसवण्याचे काम सुरू आहे. यासाठी एमआरव्हीसीने एक फ्लेक्स लावला. त्यात मराठी भाषेच्या शुद्धलेखनाचा ‘मेगाब्लॉक’ आहे. ‘शिड्या किंवा पायऱ्यांसाठी उत्तर दिशाची सिदिचा वापर करावा’, असे म्हटले आहे. ‘प्लॅटफॉर्म’ ऐवजी ‘प्लेटफार्म’ लिहिले आहे. डोंबिवली ही सुशिक्षितांची नगरी असल्याने रेल्वेने येथे फलक लावताना पुरेशी काळजी घ्यायला हवी होती, मात्र तसे न झाल्याने रेल्वे प्रशासनाला मराठीचे वावडे असल्याची चर्चा चाकरमान्यांमध्ये सुरू आहे. तो अशुद्धलेखनाचा नमुना असलेला फ्लेक्स व्हायरल झाला आहे.

निकालानंतर मन परिवर्तन..!

दिल्ली निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आगामी पालिका निवडणुकांवर होणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसला बसलेला फटका आणि भाजपची मुसंडी ही पालिका निवडणुकांची दिशा ठरवणारी मानली जात आहे. दिल्लीतील निकालानंतर उद्धवसेना आणि काँग्रेसमधील बऱ्याच नगरसेवकांचे मनपरिवर्तन होऊ शकते, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ वर्तवत आहेत. पालिका निवडणुकांसाठी बराच कालावधी असला तरी पक्ष बदल करून नवीन ठिकाणी मोर्चेबांधणीची तयारी करण्याच्या तयारीत अनेक जण असल्याची कुजबुज आहे.  

सलमानने सांगितला ‘ब्रेकअप मंत्र’

सलमान खानचे सोमी अलीपासून ऐश्वर्या-कतरीनापर्यंत बऱ्याच जणींशी त्याचे नाव जोडले गेले. यात लुलीया वंतूरचाही समावेश आहे. सलमानने कधीच ब्रेकअपचे दु:ख बाळगले नाही. पुतण्या अरहानच्या पॅाडकास्टमध्ये त्याने ‘ब्रेकअप मंत्र’च सांगितला. तो म्हणाला, ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडला जाऊ द्यावे. ज्याप्रकारे बँडएड हळूहळू नव्हे, तर खेचून काढायचे असते, तसेच ब्रेकअपचे आहे. ब्रेकअपनंतर रुममध्ये जाऊन रडून प्रकरण संपवा. पुरुषांची चूक असल्यास त्यांनी माफी मागावी, असेही तो म्हणाला. ब्रेकअपनंतर जीवाचे बरे-वाईट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी सलमानचा मंत्र फायदेशीर ठरणारा असल्याची कुजबुज आहे.

Web Title: Uddhav Thackeray Sena, Congress corporators may change their minds after Delhi results for upcoming BMC Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.