“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:45 IST2025-10-04T15:43:33+5:302025-10-04T15:45:16+5:30
Uddhav Thackeray News: लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलो. तिन्ही पक्षाने एकत्र लढले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
Uddhav Thackeray News: मी कुणाला शत्रू मानत नाही. मोदींनाही मानत नाही. ते मानत असतील तर माहिती नाही. देवेंद्र फडणवीस यांना विरोधक म्हणून बोलत नाही. फडणवीस हतबल झालेत. कशामुळे हतबल आहेत माहिती नाही. त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. एवढ्या वर्षानंतर बहुमत आहे. केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे. एवढे पाठबळ असलेला मुख्यमंत्री एवढा हतबल का हे माहिती नाही. याचे कारण म्हणजे खुले आम भ्रष्टाचार सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला होता. हा प्रश्न तीनही पक्षांनी सोडवायला हवा. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलो. तिन्ही पक्षाने एकत्र लढले पाहिजे. तिन्ही पक्षांना वाटले एकत्र लढायचे, तर लढू शकतो. पण कुणाला वाटले स्वतंत्र लढायचे तर तसे होऊ शकते. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्या स्थानिक नेते पदाधिकार्यांच्या भावनाही समजून घेऊ, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.
मी पूर्ण ताकदीने शिवसेना इथे कामाला लावेन
शिवसेनेची ताकद पुण्यात आहे. आम्ही आतापर्यंत युती आणि आघाडीचे बळी ठरलो. त्यावेळी युती म्हणून पुण्याकडे दुर्लक्ष केले. त्याबद्दल पुणेकरांची माफी मागतो. पण पुणेकरांना हवे असेल तर मी पूर्ण ताकदीने शिवसेना इथे कामाला लावेन. पण हे पुणेकरांनी ठरवायचे आहे. तुम्ही जर प्रेमाने बोलावले तर मी येईन पुण्यात, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, २००५ पासून आम्ही वेगळे झालो होतो. त्यानंतर एका मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो. आणि रोज उठून आम्ही एकत्र आलो. एकत्र आलो असे बोलण्याची गरज नाही. ५ जुलैला मेळावा घेतला. एकत्र यायचे नसते तर मेळाव्यात सोबत आलो नसतो.