"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 15:29 IST2025-10-11T15:03:13+5:302025-10-11T15:29:13+5:30
छत्रपती संभाजीनगर येथील मोर्चावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले.

"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजी नगरमध्ये हंबरडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात १ लाख रुपये दिवाळीआधीच जमा करा असं आव्हान दिलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी कशात पाहायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे म्हटलं. तसेच पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरुनही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं.
ठाकरे गटाच्या हंबरडा मोर्चावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी एकदा स्वतःला आरशात बघितलं, तर अशा प्रकारचे मोर्चे काढणार नाहीत. मी यापूर्वीही सांगितलं ठाकरेंनी त्यांच्या सरकारच्या काळात वीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. मात्र, त्यांनी फुटकी कवडी देखील शेतकऱ्यांना दिली नाही. ठाकरेंच्या आधी आम्ही सत्तेत असताना देखील २० हजार कोटींची कर्जमाफी केली होती. त्यामुळे त्यांनी काही फार मोठे काम केलं असे नाही. उलट त्यांनी घोषणा केली होती, चालू खात्यावर आम्ही ५० हजार रुपये देऊ, मात्र, त्यांनी काहीही दिले नाही. उलट १६ लाख शेतकऱ्यांना महायुतीचे सरकार आल्यावर अनुदान दिले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी मोर्चानंतर प्रत्युत्तर दिले. "मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा. तुम्हीच सांगताय की आतापर्यंत कधी आलेले नाही असं हे भीषण संकट आहे. मुख्यमंत्री असताना नागपूरला जे अधिवेशन झाले होते तेव्हा असे संकट नव्हते. तरीसुद्धा मी कर्तव्य म्हणून शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत पीक कर्जमुक्ती केली होती. जो शेतकरी नियमित कर्जफेड करतो त्यांसाठी ५० हजारांची राशी जाहीर केली होती. त्यांनी २०१७ साली केलेली कर्जमुक्ती अजूनही चालू आहे," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
"शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की त्यांना ५० हजार हेक्टरी मिळावेत. गेल्या हंगामाचे कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे. हे पीक हाती लागलं असतं तर शेतकऱ्यांना थोडे पैसे मिळून कर्जाची थोडीफार परतफेड झाली असती. आता जमीन पूर्ववत करुन देण्याची गरज आहे आणि कर्जमाफीची गरज आहे. कारण ते आता कर्ज फेडूच शकत नाहीत. त्यामुळे सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे. पंतप्रधान मुंबईत येऊन गेले पण त्यांनी शेतकऱ्यांबद्दल एक शब्दही काढला नाही. जिथे तुम्ही जाताय तिथे शेतकरी सुद्धा आहे याची कल्पना त्यांना दिली होती की नाही हे माहिती नाही. पंतप्रधान मोदींचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी हे पॅकेज जाहीर केले," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.