“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:54 IST2025-12-11T16:50:29+5:302025-12-11T16:54:11+5:30
Uddhav Thackeray PC News: मला हिंदुत्व शिकवण्यासाठी अमित शाह, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गरज नाही, असा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला.

“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
Uddhav Thackeray PC News: अमित शाह फार मोठे हिंदुत्ववादी आहेत. मला हिंदुत्व शिकवण्यासाठी अमित शाह, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गरज नाही. हिंदुत्वावरून अमित शाह यांनी शिकवू नये. अमित शाह यांनी असल्या भानगडीत पडू नये, अन्यथा अनेक गोष्टी बाहेर येतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
तामिळनाडूतील मंदिर प्रकरणावरून न्यायमूर्तींवर इंडिया आघाडीने आणलेल्या महाभियोग प्रस्तावावर ठाकरे गटाच्या खासदारांनी सह्या केल्या. यावरून अमित शाह यांनी ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी तिखट शब्दांत उत्तर दिले. पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी तीन मुद्दे उपस्थित करत थेट अमित शाह यांना अनेक प्रश्न विचारले.
भाजपाचे वंदे मातरम् हे ‘वन डे’ मातरम् आहे
अमित शाह फार मोठे हिंदुत्ववादी आहेत. त्यांचा एक फोटो कुणीतरी ट्विट केलेला आहे. मला हिंदुत्व शिकवण्यासाठी अमित शाह, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गरज नाही. देशाच्या संसदेत वंदे मारतम् वर चर्चा कशी होऊ शकते. भाजपाचे वंदे मातरम् हे ‘वन डे’ मातरम् आहे. इतक्या वर्षांनी भाजपाला वंदे मातरम् कसे आठवले, असा सवाल करत देशात काय सुरू आहे, याची जाणीव नाही. वंदे मातरम् म्हणत असताना भारतमाता किती दुःखात आहे, याकडे त्यांचे लक्ष नाही. परंतु, हिंदुत्वावरून अमित शाह हे आम्हाला विचारत आहेत. वंदे मातरम् ही चर्चा संघाचे कपडे उतरवण्यासाठी घेतले का, अशी चर्चा आहे. कारण त्यावरून आता अनेक गोष्टी बाहेर आल्या. संघ देव मानतो, त्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे मुस्लिम लीगसोबत काय साटेलोटे होते, स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी चले जाव आंदोलनाला कसा विरोध केला होता, यासह अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
गोमांस खाणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकावे
अमित शाह यांना मला प्रश्न विचारायचा आहे की, तुमच्या मंत्रिमंडळात असे मंत्री आहेत की जे गोमांस खातात आणि खुलेपणाने याबाबत सांगतात. मी गोमांस खातो, कोण मला अडवतो, असे आव्हानही देतात. ०९ डिसेंबरचा हा फोटो आहे. किरण रिजिजू आणि अमित शाह दोघेही एकत्र जेवतानाचा हा फोटो आहे. हेच किरण रिजिजू सांगतात की, मी गोमांस खातो. त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय वेगळेपणा आहे, मला माहिती नाही. मला हिंदुत्व शिकवण्यापेक्षा अमित शाह यांच्यात हिंमत असेल, तर मंत्रिमंडळातून किरण रिजिजू यांना काढून टाकावे. कारण गोमांस खातो, हे ते स्वतः सांगत आहेत, असे सांगत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला.
प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय
गेल्या काही दिवसांत दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडले. मी या मुद्द्यावर काही भाष्य केले नव्हते. अमित शाह यांना विचारचे आहे की, मंदिर पाडून तुम्ही संघाचे कार्यालय उभारले. त्याही पलीकडे जाऊन सांगतो की, मी मुख्यमंत्री असताना पालघर येथील साधू हत्याकांड या प्रकरणावरून आकाश-पाताळ एक केले होते. त्याच प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीला भाजपात घेताना तुमचे हिंदुत्व काय मेले होते? अमित शाह यांना लाज वाटली पाहिजे की, त्यांनी माझ्या हिंदुत्वावर टीका करताना त्यांच्या बुडाखाली जे हिंदुत्व आहे ते आधी पाहिले पाहिजे, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.
दरम्यान, मुद्दा राहिला त्या न्यायमूर्तींवरील महाभियोग प्रस्तावाचा, तर त्या तामिळनाडूतील केसमुळे आक्षेप घेण्यात आलेला नाही, तर आतापर्यंतची त्यांची वादग्रस्त वाटचाल आहे, त्याबाबत आजी आणि माजी न्यायमूर्तींनी आक्षेप घेतलेले आहे. एका केसवर काही झालेले नाही. दुसरे म्हणजे मंदिरावर दिवा लागलाच पाहिजे. हिंदु सण-उत्सव साजरे झालेच पाहिजेत, या मताचा मी आहे. हिंदुत्वावरून अमित शाह यांनी शिकवू नये. अमित शाह यांनी असल्या भानगडीत पडू नये, अन्यथा अनेक गोष्टी बाहेर येतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.