Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:52 IST2025-10-04T14:49:48+5:302025-10-04T14:52:33+5:30
Uddhav Thackeray And Ramdas Kadam : रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाचा दोन दिवस छळ केल्याचा आरोप शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. हे खरे की खोटे हे कळण्यासाठी उद्धव यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही त्यांनी केली. कदमांच्या आरोपामुळे उद्धवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत. याच दरम्यान आता बाळासाहेबांच्या पार्थिवावरून रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
"मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही. तो माणूस गद्दार आणि नमकहराम आहे. उत्तर देण्याची मला गरज नाही. कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि देश ओळखतो. त्यामुळे गद्दार आणि हरामखोरांना उत्तर देत नाही" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच "ज्यांनी माझा पक्ष चोरला, निशाणी चोरली, वडील चोरले त्यांचं कसलं मेरिट आहे. हा अन्याय आहे. निवडणूक आयोगाला कोणत्याही पक्षाचं नाव अचलून दुसऱ्यांना देण्याचा अधिकार नाही."
UddhavSaheb Thackeray #LIVE | पत्रकार परिषद | पुणे https://t.co/MhWC2tuwag
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 4, 2025
"माझा पक्ष हा शिवसेनाच आहे, शिवसेनाच होता आणि शिवसेनाच राहिल. मी निवडणूक आयोगाचं, आयुक्ताचं नाव हे धोंड्या ठेवलं होतं. आता तो धोंड्या गेल्या... तो कुठे गेला हे माहीत नाही. आता नवीन बोंड्या आला असेल. तो माझ्या पक्षाचं नाव बदलू शकत नाही. कारण माझ्या पक्षाचं नाव हे आजोबांनी आणि वडिलांनी ठेवलं आहे. निवडणूक आयुक्त तेव्हा जन्माला पण आले नव्हते" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
शिंदेसेनेच्या मेळाव्यात कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूविषयी केलेल्या वक्तव्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच त्यांनी पत्रपरिषदेतून जे बोललो त्यावर ठाम असून, ते बदलणार नाहीत. त्यावेळच्या डॉक्टरांना विचारा. सगळा विषय संपेल. बाळासाहेब दैवत असून, त्यांच्या पायाचे ठसे घेण्यास सांगितले असता उद्धव यांनी हाताचे ठसे घेतल्याचे सांगितले. त्याचा उपयोग त्यांनी कशासाठी केला हे जनतेला कळाल्यास उद्धव काय आहेत ते महाराष्ट्राला कळेल, असा सूचक इशारा कदम यांनी दिला.