युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:03 IST2025-08-27T13:03:07+5:302025-08-27T13:03:22+5:30
मराठी विजयी मेळाव्यात तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते, तेव्हापासून महापालिका निवडणुकीत मनसे-शिवसेना ठाकरे गट युतीची चर्चा सुरू होती.

युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
मुंबई - राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचलेला असताना राजकीय वर्तुळातही नवीन युतीचा श्रीगणेशा झाल्याचं पाहायला मिळाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंबासह शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. मागील अनेक दिवसांपासून ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्रित येतानाचे चित्र राज्यात दिसत आहे. मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील कटुता कमी होताना दिसली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे शिवतीर्थवर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले.
दरवर्षी राज ठाकरेंच्या घरी गणेशोत्सव साजरा केला जातो. या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पोहचतात. मागील वर्षीही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतले होते. मात्र यंदा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी पोहचले आहेत. ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी अनेक मराठी माणसांची आणि दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यात हिंदी भाषा सक्तीवरून दोन्ही ठाकरे बंधू यांच्यातील दुरावा कमी झाला. मराठी विजयी मेळाव्यात तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते, तेव्हापासून महापालिका निवडणुकीत मनसे-शिवसेना ठाकरे गट युतीची चर्चा सुरू होती.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज 'मातोश्री'वर
ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना राज ठाकरेंकडून मनसेच्या नेत्यांना युतीवर भाष्य करू नका असा आदेश आला होता. त्यामुळे काही वेळ कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. परंतु त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी थेट मातोश्रीवर पोहचले होते. त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कटुता दूर झाल्याचं स्पष्ट झाले. मात्र आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची राजकीय युती कशी उदयास येते हे पाहणे गरजेचे आहे.
राज ठाकरेंबाबत महायुतीची सावध भूमिका
दरम्यान, एकीकडे राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे. त्यात महायुतीचे नेते राज ठाकरेंबाबत सावध भूमिका घेताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते उदय सामंत यांनी मागील काळात राज ठाकरेंची भेट घेतली होती. आतापर्यंत सामंत ४ वेळा राज ठाकरेंना भेटले आहेत. राज ठाकरेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेताना दिसतात. त्यात राज ठाकरे यांनी महायुतीसोबत यावे अशी शिंदेसेनेची इच्छा आहे परंतु राज ठाकरेंनी अद्याप कुठलीही भूमिका जाहीर केली नाही. अलीकडच्या काळात ठाकरे कुटुंब प्रत्येक क्षणी एकत्र येत असल्याचे चित्र मराठी माणसांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. परंतु मनसे-उद्धवसेना युती यावर येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट होईल.