"औरंगजेब, अफजल खान हे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे, ते जर यांना...", ठाकरेंनी CM फडणवीसांना घेरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 18:23 IST2025-03-18T18:22:25+5:302025-03-18T18:23:31+5:30
Uddhav Thackeray on Nagpur Violence News: नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक सवाल केले.

"औरंगजेब, अफजल खान हे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे, ते जर यांना...", ठाकरेंनी CM फडणवीसांना घेरले
Nagpur Violence Uddhav Thackeray Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनागपूरचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय नागपूरमध्ये, मग नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा? ही दंगल पूर्वनियोजित होती, तर मग गृह खातं झोपा काढत होतं का? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले. औरंगजेब, अफजल खान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचे पुरावे आहेत. तुम्हाला त्यांना हटवायचं असेल, तर आंदोलन करण्यापेक्षा मोदींकडे जाऊन त्यांना हटवायला सांगा", असे खडेबोल ठाकरेंनी सुनावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेवर बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केले. औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचे संरक्षण आहे, तर औरंगजेब भाजपचा कोण? असा सवालही त्यांनी केला.
औरंगजेबाचं कुणीही समर्थन करणार नाही -ठाकरे
विधानभवन परिसरात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य सत्तेला नमवून जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं, त्या स्वराज्यावर महाराजांच्या निधनानंतर चालून आला होता. औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता, पण इथल्या मातीचा कणही जिंकू शकला नाही. अशा औरंगजेबाचं समर्थन कोणीही करणार नाही."
डबल इंजिन सरकार फक्त वाफा सोडतंय का?
"जर कोणी त्याचं थडगं उखाडण्याची भाषा करत असेल, तर फक्त भाषा किंवा आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार जे आहे, ते फक्त वाफा सोडतंय का? कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखाडण्यामध्ये असमर्थता दाखवली आहे. आणि त्याला केंद्राचे संरक्षण आहे. केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल, तर मग भाजपला आम्ही विचारतोय की तो औरंगजेब तुमचा कोण लागतो?", असा सवाल ठाकरेंनी केला.
"औरंगजेब असो, अफजल खान असो हे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. ते जर यांना वाटत असेल, नष्ट करायचे, तर आंदोलन काय करत आहात. तुम्ही सरकारकडे जा. मोदींकडे जा. मोदींना म्हणा की, गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब, ज्याला महाराष्ट्राने मुठमाती दिली, ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा. तो सोहळा जेव्हा कराल, तेव्हा चंद्राबाबू आणि नितीश कुमारांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा. सोप्पा विषय आहे. त्यात दंगल करायचे कारण काय?", असे ठाकरे म्हणाले.
एका प्रश्नात अनेक प्रश्न दडलेले -उद्धव ठाकरे
"गृहमंत्र्यांचे घर नागपूर आहे. आरएसएस मुख्य कार्यालय नागपूरमध्ये आहे. मग नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा? इतकी वर्ष तुम्ही नेमकं काय केलं? जर पूर्वनियोजित असेल, तर मग तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही? आला असेल, तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? एका प्रश्नात अनेक प्रश्न दडलेले आहेत", असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.