देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:14 IST2025-12-11T16:13:01+5:302025-12-11T16:14:07+5:30
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis: या सरकारचं लोकांकडे लक्षच नाही, केवळ प्रचारांमध्ये व्यस्त आहे

देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis: महायुतीतील मंत्र्यांचे रोज नवनवीन घोटाळे उघड होत आहेत आणि मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पांघरूण खाते तयार करावे, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. नागपूरला विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पोहचल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"महायुतीतील नेतेमंडळींचा कुणालाही कसलाही पायपोस राहिलेला नाही. मित्र-मित्र म्हणून एकमेकांवर धाडी टाकल्या जात आहेत. एकमेकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली जात आहेत. रोज कुठल्या ना कुठल्या मंत्र्याचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी दिसत आहेत. काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. तरीसुद्धा मुख्यमंत्री ढिम्म आहेत. मुख्यमंत्र्यांनी आता एक खाते निर्माण केले पाहिजे आणि एक पांघरूण मंत्री ठेवायला पाहिजे. म्हणजे किमान इतर बाकीचे मंत्री पांघरूण बघून हात पाय पसरतील. कारण मुख्यमंत्री त्यांच्या चुकांवर पांघरूण घालायलाच बसले आहेत. इतर खात्यांच्या सोबतच मुख्यमंत्र्यांनी पांघरूण खातेही सुरू करावे आणि स्वतः त्याचा चार्ज घ्यावा," असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
"आम्ही विरोधी पक्ष पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव दिलेले आहे. आम्ही आधीच दावा सांगितलेला आहे. पण अद्याप आम्हाला उत्तर मिळालेले नाही. सरकार आम्हाला विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी घाबरत आहे का? हा प्रश्न आहे. सरकार मजबूत आहे तर तुम्ही कुणाला घाबरत आहात? तुमच्या २०० हून जास्त जागा निवडून आल्या आहेत. केंद्र सरकारचा तुमच्याकडे मोठा आशीर्वाद आहे. तरीही तुम्ही विरोधी पक्षनेते पदाला का घाबरत आहात? जर विरोधी पक्ष नेतेपदासाठी नियम लावणार असाल, तर उपमुख्यमंत्रीपद देखील संवैधानिक आहे. तेही रद्द करा," अशी मागणी त्यांनी केली.
"विरोधी पक्ष नेते निवडण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे की मुख्यमंत्र्यांना ही लोकशाहीची मांडणी आहे. या गोष्टी उगाचंच फिरवून ठेवल्या जात आहेत. अध्यक्षांबाबतची आमची मतं आम्ही गेल्या टर्ममध्ये व्यक्त केलेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी याचा जाब विचारला पाहिजे. सरकारचे लोकांकडे लक्षच नाही. हे सरकार प्रचारांमध्ये व्यस्त आहे. एक निवडणूक संपली की दुसऱ्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू होईल. असाच हा खेळ सुरू ठेवला जाईल," अशी शंका उद्धव यांनी व्यक्त केली.