पराभवाच्या भीतीमुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव; भाजपाची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:03 IST2025-10-17T17:02:25+5:302025-10-17T17:03:04+5:30
बिहारप्रमाणे महाराष्ट्रात ‘एसआयआर’ची मागणी उबाठा करणार का? असाही केला सवाल

पराभवाच्या भीतीमुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव; भाजपाची बोचरी टीका
"आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची पराभवाच्या भीतीने गाळण उडली आहे. त्या निराशेतून संजय राऊत फुटकळ आरोप करत आहेत. काही ना काही निमित्त करून निवडणुका पुढे ढकलण्याचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांचा डाव आहे," अशी बोचरी टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"बिहारमध्ये मतदार याद्यांत सुधारणा करण्यासाठीचे अभियान झाले तसे अभियान महाराष्ट्रातही करावे अशी मागणी संजय राऊत, उद्धव ठाकरे करणार का? बिहारमध्ये झालेल्या मतदार यादी दुरुस्ती (एसआयआर)ला विरोध करायचा आणि आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका पुढे ढकला अशी मागणी करण्याचे नाटक संजय राऊतांकडून सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नोटबंदी निर्णयामुळे राऊतांना त्यांच्याकडे असलेला प्रचंड काळा पैसा पांढरा करता आला नाही. त्यामुळे त्यांना नोटबंदीमुळे पोटदुखी होणारच," असा टोलाही त्यांनी लगावला.
गुजरात पॅटर्न उबाठा गटात राबवावा
"राऊतांमुळे उबाठा गटाची कोंडी होत असून अवस्था दयनीय आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात गुजरात पॅटर्न राबवून राऊत यांना हटवावे. देवेंद्र फडणवीस यांना तीन वेळा जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे महाराष्ट्राचे राजकीय सुपरस्टार आहेत. उद्धव ठाकरे आणि राऊतांच्या नेतृत्वात सातत्याने अपयश पदरी पडत असल्याने सर्वात मोठे 'लूजर' कोण असतील तर ते राऊत आहेत," असा घणाघात त्यांनी केला.
"दिवाळी हा बळीराजाचा सण आहे. मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळले असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे पैसे जमा होत आहेत. ३२ हजार कोटींचे पॅकेज घोषित करण्यात आले आहे. संकटकाळी शेतकऱ्यांना नवी उमेद देऊन त्यांना आधार देण्याची गरज असताना, शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करू नये असे म्हणणे म्हणजे त्यांना नाउमेद करणे होईल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अशी विधाने टाळावीत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून अस्मानी संकटामुळे आलेले नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे," असे त्यांनी नमूद केले.