उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 09:35 IST2025-07-29T09:33:37+5:302025-07-29T09:35:26+5:30
Raj Thackeray Uddhav Thackeray Meet: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर भेट घेतली. ही फक्त औपचारिकता होती की, हेतूपुरस्सर दिलेले संकेत?

उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
Raj Thackeray Uddhav Thackeray Meet: हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवत विजयोत्सव साजरा करण्यासाठी वरळी येथे एकत्र येऊन गळाभेट घेतलेले ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी थेट मातोश्रीवर पोहोचले. अनेक वर्षानंतर राज ठाकरे मातोश्रीवर आल्याने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. परंतु, ५ जूननंतर लगेचच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भेटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पुनर्भेटीवरून राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत.
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
ठाकरे बंधूंची ही वाढती जवळीक दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी ठरली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते एकत्र येणार काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असे म्हटले जात आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर जाऊन भेटीचा सिलसिला कायम ठेवताना दिसत आहेत. असे असले तरी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत्या भेटी हा महायुतीसाठी एक प्रकारे इशारा तर नाही ना, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
एका द्वीटने दिला महायुतीला इशारा
राजकारणातले काही संकेत अनेकदा शब्दांपेक्षा मौनात किंवा एखाद्या फोटोत लपलेले असतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर भेट घेतली. निमित्त होतं उद्धव यांचा वाढदिवस. शुभेच्छा दिल्या, फोटोही काढला. सुमारे २० मिनिटे चर्चा केली आणि मग एक द्वीट. त्यात खास काय होतं तर ते उद्धव यांचा 'शिवसेना पक्षप्रमुख' असा उल्लेख ! ही फक्त औपचारिकता होती की, हेतूपुरस्सर दिलेले संकेत? ऑगस्टमध्ये शिवसेना पक्ष, चिन्ह कुणाचे, याचा निकाल लागणार आहे. त्यामुळे राज यांनी केलेला हा उल्लेख काही संकेत देतोय का? मनसे-शिवसेना युतीबाबत महायुतीला अप्रत्यक्षपणे दिलेला हा इशारा तर नव्हे ना? आता हे 'समीकरण' भेटीपुरतेच राहते की राजकारणातही येते, हे लवकरच कळेल, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे समजते.
अमित साळुंखेला अटक, शिंदेसेनेच्या मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप; यामागे महाशक्तीची करणी नाही ना!
दरम्यान, उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वास्तव्य असलेल्या खोलीत गेले. बाळासाहेबांच्या आसनापुढे नतमस्तक झाले. हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी वरळी येथे ५ जून रोजी मेळाव्यात उद्धव व राज दोन दशकांनंतर एकत्र आले होते.