Uddhav Thackeray: 'अडीच वर्षांपूर्वी शब्द मोडला, पाठित वार केला', उद्धव ठाकरेंचे भाजपवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 14:27 IST2022-07-01T14:23:00+5:302022-07-01T14:27:44+5:30
Uddhav Thackeray: 'काल जे सरकार स्थापन झालं, तेच मी अडीच वर्षांपूर्वी मागितलं होतं. शब्द पाळला असता तर कालचा कार्यक्रम सन्मानाने झाला असता.'

Uddhav Thackeray: 'अडीच वर्षांपूर्वी शब्द मोडला, पाठित वार केला', उद्धव ठाकरेंचे भाजपवर टीकास्त्र
मुंबई: काल(दि.30 जून) शिवसेनेचे बंडकोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपने मिळून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्ला केला. यावेळी त्यांनी परत एकदा अडीच वर्षांपूर्वीच्या अमित शहांच्या शब्दाची आठवण करुन दिली.
'हेच मी मागितलं होतं'
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''सर्वप्रथम मी नवीन सरकारचे अभिनंदन करतो. सरकारकडून महाराष्ट्राचं भलं व्हावं, हीच त्यांच्याकडे अपेक्षा. माझ्यासमोर काही प्रश्न पडले. ज्यापद्धतीने हे सरकार स्थापन झालं, त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री केलां. हेच मी अडीच वर्षांपूर्वी मागितलं होतं. तसं झालं असतं तर आज अडीच वर्षे झालीच आहेत, कालचा कार्यक्रम सन्मानाने झाला असता.''
'तेव्हा पाठीत वार केला...'
''तेव्हा नकार देऊन आता भाजपने असं का केलं? शिवसेना तुमच्यासोबत होतीच ना. लोकसभा आणि विधानसभेतही तुमच्यासोबत होती. निवडणुकीच्या आधी हेच ठरलं होतं. मला कशाला मुख्यमंत्री बनवायला लावलं. अडीच वर्षांपूर्वी शब्द मोडला, माझ्या पाठीत वार केला. हे म्हणत आहेत की, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. पण, तसा शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेलाच नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून मुख्यमंत्री होऊ शकत नाही.''
'अमित शहांनी शब्द मोडला'
''तेव्हा अमित शहांनी दिलेला शब्त पाळला असता, तर किमान अडीच वर्षे भाजपचा मुख्यंत्री झाला असता. आता पाचही वर्षे भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही. आम्हीही तेव्हा माझ्या स्वाक्षरीचा करार करुन तो मंत्रालयात लावला असता. म्हणजे, तो सगळ्यांना दिसला असता. पण, त्यांनी शब्द पाळला नाही, पाठित खंजीर खुपसले,'' असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकशाही धोक्यात
''लोकशाहीचे चार स्तंभ असतात, या चारही स्तंभाने लोकशाही वाचवायला पुढे यायला पाहिजे. लोकशाही उरली नाही तर या स्तंभाला काहीही अर्थ राहणार नाही. आपल्याकडे गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे. ज्याने मतदान केले त्याला कळायला हवं कुणाला मतदान हवं. आम्ही महाविकास आघाडीची स्थापना केली. निवडून आलेल्या प्रतिनिधीला बोलावण्याचा अधिकार हवा असं बाळासाहेब म्हणाले होते. माहिमच्या मतदाराने टाकलेले मत व्हाया सूरत, व्हाया गुवाहाटी गोवा फिरत असेल तर लोकशाही आहे कुठे?'' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.