Uddhav Thackeray Interview: आताच्या घडीला वेगवेगळे वारे वाहत असल्याचे पाहायला मिळत असले, तरी त्यात काही गॅसचे फुगेही आहेत. जे काही काळ वर जातात आणि मग गॅस गेला की, खाली पडतात. गॅसचे तरंगणारे फुगे म्हणजे काही वारे नाहीत. ठाकरे हे वारे नाहीत. मागील अनेक पिढ्या आमची पाळेमूळे महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली आहेत आणि खोलवर गेलेली आहेत. जास्त पिढ्यांचा उल्लेख केला नाही, तरी आमच्या आजोबांपासून शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे, अशी मन की बात उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
ठाकरे म्हणजे सदा सर्वदा संघर्ष, हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही, तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलेलो आहोत. ठाकरे ब्रँड हा आम्ही तयार केलेला नाही. तो लोकांनी स्वीकारला आहे. आम्ही सत्तेसाठी नाही, तर जनतेशी प्रामाणिक आहोत. ठाकरे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत. आपल्या वेदनेला निर्भीड वाचा फोडणारे आहेत, हे जनतेला माहित आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनता इतकी वर्षे आमच्याबरोबर आहे. ठाकरेंनी महाराष्ट्र, मराठी अस्मिता आणि हिंदू अस्मितेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच काम केले . आमची ही ओळख अनेकांनी पुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, आमची ओळख पुसू इच्छिणारेच पुसले गेले, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला.
ठाकरे म्हणजे नुसता ब्रँड नाही, तर...
आम्ही सत्तेत किती काळ राहिलो, यापेक्षा सत्तेच्या विरोधात.. सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जे काही अरिष्ट आहे, त्याविरोधात आम्ही संघर्ष करत आलो आहोत. इतकी वर्ष ठाकरे ब्रँड टिकून राहिला. ठाकरे म्हणजे नुसता ब्रँड नाही, तर ठाकरे म्हणजे मराठी माणसाची, महाराष्ट्राची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे. ठाकरे ब्रँडची तिसरी पिढी असून, तो इतका कसा टिकला हे मी कसे सांगणार, जनतेनी सांगितले पाहिजे. आज माझ्याकडे काही नाही. तरीही कुठेही गेलो, तरी लोक आपुलकीने स्वागत करतात, बोलायला येतात. जे काही घडत आहे, त्याबाबत संताप व्यक्त करतात, हळहळ व्यक्त करतात. काही झाले, तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगतात, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
जे पोकळ आहेत, त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागत आहे
ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी अगदी राज्यापासून दिल्लीपर्यंत अनेक जण प्रयत्न करत आहेत, या संजय राऊतांच्या विधानावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, याचे कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतेच नाव नको आहे. स्वतःची तुलना ते देवाबरोबरही करायला लागले आहेत. अशा लोकांशी आपण काय बोलणार. हे लोक काळाच्या ओघात येतात आणि काळाच्या ओघात जातात. आपल्या परंपरेला कुणी मानत नसेल, तर ती परंपराही त्यांना मानणार नाही. ज्यांच्याकडे काहीच नाही, जे पोकळ आहेत, त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागत आहे. हेच ठाकरे ब्रँडचे वैशिष्ट्य आहे.
दरम्यान, हे स्वतः पोकळ आहेत, स्वतः काहीच निर्माण केले नाही. कधी कुठल्याही क्षेत्रात आदर्श निर्माण करता आलेला नाही. त्यांना भले १०० वर्ष झाली असतील आणखी, काही वर्ष असतीलही, तरीदेखील ते राज्याला, देशाला काही देऊ शकले नाहीत. म्हणून ठाकरे हा ब्रँड चोरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ठाकरे ब्रँड चोरून आपण ठाकरेंचे कसे भक्त आहोत, हे ठासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना ते दिसत आहेत